गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात नेतृत्व बदल करण्यात आला आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांना संधी देण्यात आली असून त्यांनी आज (सोमवारी) पद व गोपनीयतेची शपथ घेतली. रविवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री रुपाणी यांनी पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. सर्व आमदारांनी त्यांच्या नावाला सहमती दर्शवली होती.
आज (सोमवारी) गांधीनगर येथील राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
भूपेंद्र पटेल यांची विधानसभा सदस्य म्हणून ही पहिलीच टर्म आहे. रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. सी आर पाटील, केंद्रीयमंत्री मनसुख मांडवीय व उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेमध्ये होते. मात्र भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याने ‘रेस’मध्ये नसतानाही त्यांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त मंत्रिमंडळामध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आला नसल्याने गांधीनगर येथील राजभवनात आज केवळ मुख्यमंत्री पटेल यांचाच शपथविधी पार पडला.
Bhupendra Patel sworn-in as new Chief Minister of Gujarat pic.twitter.com/COPD9CsCsw
— ANI (@ANI) September 13, 2021