Rohit Pawar : राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत असताना दुसरीकडे ओबीसींचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी छगन भुजबळ सभा घेताना दिसत आहेत. भुजबळांनी घेतलेल्या सभेवरच आता टीका होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी देखील छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर आरोप केले आहेत. याविषयी बोलताना, छगन भुजबळ यांना भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली होती. त्यामुळेच मराठा आणि ओबीसी वाद निर्माण झाला असल्याचा आरोपी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. या आरोपावर छगन भुजबळांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर छगन भुजबळ यांनी उत्तर देताना,” मला कुणी स्क्रिप्ट देत नाही. मला शरद पवारांनी कधी स्क्रिप्ट दिली नाही, ना कधी अजितदादांनी स्क्रिप्ट दिली, असे भुजबळ म्हणाले. ओबीसीचे स्क्रिप्ट हे मंडल आयोग, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न आंबेडकर यांचे स्क्रिप्ट आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी, राज्यातील ओबीसी समाज पूर्णपणे माझ्या पाठिशी आहे. मी एकटा पडलेलो नाही. काही नेते मंडळीची अडचण झाली असेल. काही मंत्री म्हणाले, भुजबळ यांच्या स्टेजवर जाणार नाही. माझी काही हरकत नाही, माझ्या स्टेजवर येऊ नका स्वतंत्र बैठक घ्या. ओबीसी आरक्षणचा बचाव करणे ही तुमची आणि माझी भूमिका एकच आहे. त्यामुळे तुम्ही रॅली घ्या, बैठक घ्या पण ओबीसीचा लढा सुरू ठेवा,” असे त्यांनी म्हटले.
भुजबळांनी पुढे बोलताना,”ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात काही नेते माझ्या सोबत येतील काही जातील हे चालूच राहणार आहे. काही लोकांच्या अडचणी असू शकतात, मला त्याबद्दल काही रोष नाही. या लोकांनी त्यांचे मन अंबडच्या सभेत मोकळे केले आहे. कुठेही जा पण ओबीसीसाठी लढा, माझ्या विरोधात बोलले तरी चालले,पण ओबीसीच्या बाजूने बोला.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
मनोज जरांगेच्या नाशिकमध्ये होणाऱ्या सभेवर देखील भुजबळांनी प्रतिक्रिया देताना, “कोणालाही कुठेही सभा घेण्याचे अधिकार आहे. मनोज जरांगेना सभेसाठी शुभेच्छा असून त्यांचे नाशिकमध्ये स्वागत आहे. मी इतरांप्रमाणे कोणालाही गावबंदी करत नाही. प्रत्येकाने आपले मत मांडवी, लोकांना जे पटेल त्यांच्या बाजूने लोक जातील,” असे त्यांनी म्हटले.