शिरवळ(प्रतिनिधी) : शिरवळ आणि सारोळा येथील सीमेवर असणाऱ्या तसेच मृत्यूचा अड्डा बनलेल्या सारोळा शिरवळ मध्ये असलेल्या नीरा नदीवरील पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या करणाऱ्या खटाव तालुक्यातील 24 वर्षीय तरुणीस स्थानिक तरुणांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश आले.
– सारोळा शिरवळ निरा नदीवरील घटना
– स्थानिक तरुणांची तात्काळ मदत
सारोळा (ता. भोर) येथील पुलावरून बुधवारी (दि.28) दुपारच्या दरम्यान एका तरुणीने पुलावरील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . याची माहिती स्थानिक तरुण बंटी धाडवे यांना मिळताच त्यांनी सतर्कता दाखवत नीरा नदी पात्राकडे धाव घेत मुलीला स्थानिक मच्छीमार यांच्या बोटीच्या साह्याने बाहेर काढले व अँब्युलन्स पर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन मुलीला वाचविण्यासाठी प्रयत्न केले.
या कार्यात ग्रामपंचायत सदस्य शुभम दळवी, हर्षद बोबडे,साईनाथ धाडवे ,मनोज पांगारे ,साहील काजी तसेच शिरवळ रेस्क्यु टीम यांनी मदत केली . ॲम्बुलन्स ड्रायव्हर तुळशीराम अहिरे यांच्याशी संपर्क केला गेला गेला असता ॲम्बुलन्स तसेच किकवि पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश लडकत व राजेंद्र चव्हाण यांनी वाचविलेल्या तरुणीस किकवी (ता. भोर) येथील अंकुर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
सध्या तरुणीवर उपचार सुरू असून तब्येतीत सुधारणा होत आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.