पुणे : ॲग्रीकल्चरल डेव्ललपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘भीमथडी’ जत्रेने आज उत्साहात 14व्या वर्षात प्रदार्पण केले आहे.
आज या जत्रेचा दुसरा दिवस सकाळी 10 वाजता वाजल्यापासून लोकांना गर्दी केली. यावेळी बचत गटांच्या महिलांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील विशेष हस्तकलेच्या वस्तूंचे उद्घाटन केले.
यावेळी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राची संस्कृती म्हणून जगभर पंढरपूरची वारी प्रसिद्ध आहे आणि या संस्कृतीचे संवर्धन म्हणून भीमथडी जत्रेमध्ये वारीच्या संकल्पनेचा विचार करण्यात आला आहे. निष्ठा, सेवा, श्रद्धा, कला, संस्कृती आणि अध्यात्म याचे दर्शन व्हावे या उद्देशाने पंढरीच्या वारीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे.
नेहमीप्रमाणेच यंदाही आगळी-वेगळी भीमथडी जत्रा करण्याचा संस्थेने प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण कलाकारांना त्यांची कला दाखवता यावी या हेतूने त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील बारा बलुतेदार यांना व्यासपीठ दिले आहे. शंभर वर्षांपूर्वी खेडे कसे होते याचे जीवंत चित्रण मागील आठ भीमथडी जत्रेमध्ये दाखविण्यात आले. या वर्षी पिंगळा, वासुदेव, ज्योतिषी, नंदीबैल, कुंभार, बुरुड, जागरण, गोंधळी, पोतराज, मरिआईचे भक्त, सनई-चौघडा अशा अनेक कलाकारांचा या जत्रेत सहभाग आहे. तसेच ग्रामीण भागातील खाद्य परंपरा शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही रुपात चाखण्यास मिळणार आहे. घुट-हुलग्याचे माडगे, मांडे, धपाटे, मोदक, पुरणपोळी, पिठलं-भाकरी, चुलीवरचं मटण, गावरान कोंबडी अशा अस्सल गावराण जेवणाचा तडका पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. तर, आज रात्री राजस्थानी सुफी संगीत संस्कृतीचे दर्शन हे खास आकर्षण राहिले. शुक्रवारी (ता. २०) हिंदुस्थानी/सूफी संगीताने भीमथडी जत्रा मंत्रमुग्ध होणार असून शनिवारी (ता. २१) तुम्हाला ढोल-ताशाच्या तालात मराठी गाण्याचा आधुनिक संगम बघायला मिळणार आहे.