मंचर- आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, आहुपे, पाटण खोऱ्यात बुधवारी (दि. 25) दुपारी वादळी वाऱ्यासहीत अवकाळी, गारांचा पाऊस पडला, यामुळे हिरडा झाडांचे नुकसान झाले. काही घरांची छपरे उडून गेली. या पावसाने भागातील ओढे वाहिले.
आदिवासी भागातील भीमाशंकर, आहुपे, पाटण खोऱ्यात बुधवारी दुपारी अचानक अवकाळी पाऊस पडला. सुमारे दीड तास वादळीवारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.गारादेखील मोठ्या प्रमाणावर पडल्याने या भागातील उत्पन्नाचे एकमेव साधन असणाऱ्या हिरडा झाडांचे नुकसान झाले. त्याचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. या पावसात काही घरांची छपरे उडून गेली आहेत, तर ओढे वाहू लागले, यामुळे या परिसरातील चारा (भाताचा पेंडा, गवत) भिजून गेल्याने पुढील काळात चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
भीमाशंकर परिसरातील पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेला कोंढवळ धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. बुधवारी (दि. 25) दुपारी पावसाळ्यातील पावसासारखा पाऊस पडला. या भागात मोठी बाजारपेठ असलेल्या तळेघर बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. यात विशेषतः किराणा दुकाने, कपडे आदी दुकानांचे नुकसान झाले. येथील शेतकरी दत्ता लोहकरे यांच्या शेडनेटचे मोठे नुकसान झाले आहे. भीमाशंकर ते जांभोरी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. या पावसाने गहू, भाजीपाला, धान्यांचे, तसेच सरपणाचे (फाटी) नुकसान झाले आहे.