भाकरी फिरवण्याची रणनीती शरद पवार यांच्याकडून अंतिम

शरद पवार हे काय रसायन आहे आणि त्यांचे पॉवरबाज राजकारण काय असते, याची प्रचिती रविवारी पुन्हा सातारा जिल्ह्याला आली. नवमतदाराला चुचकारणाऱ्या पवारांनी साताऱ्यातील राजेंना “हे वागणं बर नव्हं’ अशा थेट कानपिचक्‍या दिल्या. राजवाड्यातील सत्ता बाहेर खेचण्याची हीच संधी असल्याचे हेरून पवारांनी पुन्हा भाकरी फिरवण्याची रणनीती अंतिम केली आहे. पक्षाच्या जाहीरनामा प्रकाशनानंतर कॉंग्रेसशी चर्चा करून पश्‍चिम महाराष्ट्रातील उमेदवार निश्‍चित होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कल्याण रिसॉर्टच्या मेळाव्यात शरद पवारांच्या नेतृत्वाला सातारा जिल्हा का मानतो हे दिसून आले. पवार साताऱ्यातील निष्ठावान शिलेदारांसमवेत राजकीय प्रतिष्ठेची चढाई चिवटपणे लढत आहेत. साताऱ्यात पवारांना जो राजेशाही धक्का भाजपने दिला तो आपल्याला बसलाच नाही, असा पवारांचा अविर्भाव होता.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मातब्बर नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातही अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादी विशेषत: शरद पवारांसमोर हा किल्ला अभेद्य राखण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र, पवारांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढत राजकीय पत्ते उघडायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत पवारांच्या भाषेत सांगायचे झाल्यास भाकरी फिरवून नवीन चेहऱ्याच्या निष्ठावंतांना संधी देण्याची वेळ आली आहे.

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. या जिल्ह्यातील लोकांनी नेहमीच राष्ट्रवादी अन्‌ शरद पवार यांच्या पाठीशी ताकद देण्याचे काम केले. मात्र, विधानसभेपूर्वी खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पक्षांतर केले. तर फलटणच्या रामराजे नाईक-निंबाळकर यांचे तळ्यात-मळ्यात चालू असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर कार्यक्रमापासून लांब राहिले.

मात्र, संजीवराजेंकडून पवारांना जो निरोप जायचा तो गेलाच. साताऱ्यात विधानसभेसाठी पवारांना “हाय क्‍लास मेरीट’ आवश्‍यक आहे. दीपक पवारांनी पक्षप्रवेश करून पवारांना गळ घातली तरी आता साताऱ्यात तगडी लढत नाही तर जिंकणारा उमेदवार हवा आहे. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून पवार काय उतारा शोधणार, हे पवारच जाणोत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)