कोलकता – पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असे भाकीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शनिवारी केले. बंगालला केवळ आपली कन्या (ममता) हवीय, असे त्यांनी म्हटले आहे.
बंगाल विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्या राज्यात 8 टप्प्यांत मतदान होईल. त्यानंतर 2 मे यादिवशी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर किशोर यांनी ट्विटरवरून तृणमूलच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला. देशातील लोकशाहीसाठीच्या महत्वाच्या लढ्यांपैकी एक बंगालमध्ये लढला जाईल. बंगाली जनता संदेश देण्यासाठी सज्ज झाली आहे, असे त्यांनी म्हटले.
माझे हे ट्विट निकालादिवशी पुन्हा जरूर पहा, असेही त्यांनी नमूद केले. तृणमूलची प्रचार रणनीती निश्चित करण्यात किशोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. आजवर किशोर यांनी विविध पक्षांना मदत केली. ती मोठ्या प्रमाणात निवडणुकांत उपयुक्त ठरल्याची उदाहरणे आहेत. याआधी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या ट्विटमधून किशोर यांनी बंगालमध्ये भाजपची नामुष्कीजनक पीछेहाट होणार असल्याचा दावा केला होता. भाजपला मिळणाऱ्या जागांनी दोन आकड्यांचा टप्पा पार केल्यास ट्विटर सोडेन, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.