मुंबई – छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात घराघरात पोहचली आहे. उत्तम आणि अचूक विनोदी शैलीने तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. तिच्या बेधडक वक्तव्यामुळे देखील ती चर्चेत राहिली आहे. अनेकदा तिला लठ्ठपणामुळे हिणवले जाते. मात्र त्याला ती सडेतोड उत्तर देते. यावर तिने एका मुलाखतीत भाष्य केले आहे.
एका मुलाखतीत वनिता म्हणाली की, “मला लठ्ठपणावरून अनेकदा लोक बोलतात, मी त्याकडे लक्ष देत नाही. याचा अर्थ मी लठ्ठपणाला प्रमोट करते असे नाही. कारण लठ्ठपणा हा वेगवेगळ्या पद्धतीने आलेला असतो. कुणाचे हार्मोन चेंज होऊन लठ्ठपणा येतो, तर कुणाला इतर कोणत्याही कारणामुळे आलेला असतो. लठ्ठपणापेक्षा फिट राहणे गरजेचे आहे. कारण एका वयानंतर लठ्ठपणा आपल्यासाठी त्रासदायकही होऊ शकतो. समाजाने एक चौकट बनवून ठेवली. बारीक असलेला, अॅब्स असलेला माणूसच सुंदर आहे, ही चौकटच चुकीची आहे. लठ्ठ असणं हे चुकीचं नाही.”
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली की, “तुमच्या लठ्ठपणामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर ते चुकीचंच आहे. त्यामुळे त्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणून लठ्ठपणा वाईट आहे असं मी म्हणत नाही. दिसणं आणि तुमची बॉडी हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. दिसण आणि फिट राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी जाड असून मी फिट आहे. मला काहीच फरक पडत नाही. मी छान धावू शकते, फिरू शकते, उठू शकते तर मग काय प्रोब्लेम आहे. मी फिट आहे. पण जर मी फिट नसेल तर त्यावर आपण काम करणं गरजेचं आहे. पण त्यासाठी आधी मी स्वत:ला स्वीकारणं गरजेचं आहे.” अशा शब्दात वनिताने आपले मत व्यक्त केले.
दरम्यान, याआधी वनिताने न्यूड फोटोशूट केले होते. ज्यावरून तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. Body Positivity Movement चा संदेश देत एका कॅलेंडरसाठी हे फोटोशूट केले होते. प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरूरकर याने हे फोटोशूट केले होते. यातून तिने बॉडि शेम करणाऱ्यांना संदेश दिला होता. ‘मला माझ्यातील टॅलेंटचा, माझ्यातील प्रतिभेचा, आत्मविश्वासाचा अभिमान आहे. तसंच मला माझ्या शरीराचा देखील अभिमान आहे. कारण मी ‘मी’ आहे’, अशी पोस्ट वनिताने शेअर केली होती.