ठाणे – लोकसभा निवडणुकांचे तीन टप्प्यातील मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे चार दिवस उरले आहे. सोमवारी (२९ तारखेला) चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र, या मतदानापूर्वीच महायुतीमध्ये फूट पडल्याचं समोर आलं आहे. ही फूट वारंवार अपमान झाल्याच्या भावनेतून निर्माण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रिपाइंने महायुतीचे उमेदवार राजन विचारेंचा विरोध करत महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
ठाण्यात आम्ही शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात आहोत, तर राष्ट्रवादीच्या तिकीटावर रिंगणात उतरलेले महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना आमचा पाठिंबा आहे, असं रिपाइंचे ठाणे उपाध्यक्ष, संघटक आणि प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आहे.