करिना कपूरने काही दिवसांपूर्वीच आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव जेह अली खान ठेवण्यात आले आहे. तिचा पहिला मुलगा तैमूरही आता मोठा झाला आहे. प्रेग्नन्सीच्या या दोन अनुभवांवर आधारित एक पुस्तक करिनाने लिहिले आहे.
तिने स्वतः सोशल मीडियावर या पुस्तकाची माहिती दिली आहे. या पुस्तकाचा विषय आणि त्याचे शिर्षक दोन्ही भन्नाट आहे. “करिना कपूर खान की प्रेग्नसी बायबल’ असे या पुस्तकाचे नाव आहे.
हे पुस्तक म्हणजे आपले तिसरे अपत्य असल्याचे बेबोने म्हटले आहे. मात्र, तिच्या या पुस्तकामुळे ती अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुस्तकाच्या शिर्षकावर अखिल भारतीय अल्पसंख्याक बोर्डाने आक्षेप घेतला आहे.
या बोर्टाचे अध्यक्ष डायमंड युसुफ यांनी कानपूरमध्ये बोर्डाची एक मिटींग घेऊन या पुस्तकाच्या शिर्षकाची निंदा करणारा ठरावही केला आहे. आता यासंदर्भात करिनाविरोधात कायदेशीर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
करिनाविरोधात तक्रार दाखल केली जाण्याचीही शक्यता आहे. करिनाने या पुस्तकात आपल्या दोन्ही प्रेग्नसीच्या अनुभवांबाबत लिहिले आहे, असे समजते आहे. यातून स्वस्तातली प्रसिद्धी मिळवण्याव्यतिरिक्त करिनाचा अन्य कोणताही हेतू निश्चितच नसणार हे उघड आहे.