पुणे – शहरात जी-20 परिषदेनिमित्त महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांना मदत मागून अनेक ठिकाणी “सीएसआर’अंतर्गत सुशोभीकरणाचे काम करून घेतले आहे. मात्र, या कामावर आता भर रस्त्यात राडारोडा टाकण्यात आला आहे. हा प्रकार कर्वे रस्त्यावर उघडकीस आला आहे.
कर्वे रस्त्यावर मेट्रो मार्गाखालील बाजूस दुभाजकात वृक्षारोपण तसेच सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यावर रस्ता खोदाईतील राडारोडा तसेच तुटलेली चेंबर टाकण्यात आली आहेत. या प्रकाराबाबत माजी विरोधीपक्ष नेते उज्ज्वल केसकर यांनी सोशल मीडियावर महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. तसेच या प्रकरणी जबाबदार असलेल्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेकडून शहरात जी-20 साठी कोट्यावधीची विकासकामे करण्यात आली होती. मात्र, पहिल्या परिषदेवेळी महापालिकेकडे आवश्यक असलेला निधी नसल्याने महापालिकेने शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी चौकाचे सुशोभीकरण करण्याची विनंती केली होती.