शिक्रापूर -कोंढापुरी (ता. शिरूर) येथील एका व्यक्तीवर 2020 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत वॉरंट बजावण्यास गेलेल्या शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला दमदाटी करत धक्काबुक्की करुन दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत
शिक्रापूरचे सहायक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी सिध्दार्थ शशिराव धिवर, राज शशिराव धिवर, करुणा धिवर (रा. कोंढापुरी ता. शिरूर) या तिघांवर शिवीगाळ, मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
कोंढापुरी येथील सिध्दार्थ धिवर याच्यावर 2020 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्याबाबत नुकतेच न्यायालयाकडून अटक वॉरंट आलेले असता त्यांना वॉरंटनुसार सिद्धार्थ धिवर यांना वॉरंट बजावण्यासाठी शिक्रापूरचे पोलीस पथक बुधवारी सकाळच्या सुमारास वॉरंट घेवून कोंढापुरी येथे धिवर यांच्या घरी गेले होते.
त्यावेळी सिद्धार्थ याने पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करत तुमचा काय संबंध आमच्या येथे येण्याचा असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करू लागला. दरम्यान सिद्धार्थची आई करुणा धिवर हिने काठी घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. तसेच यावेळी राज धिवर याने पोलिसांना धक्काबुक्की केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार करीत आहेत.