चौघा जणांच्या टोळक्याने केली मारहाण
नगर – वाहनचालकाला मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याची चेन मारहाण करून हिसकावून नेली. नगर-पुणे रस्त्यावरील चास व अरणगाव शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, योगानंद स्वामीराव हत्तरके (रा. मल्लीकार्जूननगर, सोलापूर, हल्ली रा. आकाशनगर, वारजे, पुणे) हे दुचाकीवरून नगर-पुणे रस्त्याने जात असताना चास गावच्या शिवारात शनिवारी (दि. 18) अडीच वाजता चासमधील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ व अरणगाव शिवारात चार तरुणांच्या टोळक्याने मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल हॅंडसेट व सोन्याची चेन हिसकावून नेली. एकूण 58 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात योगानंद हत्तरके यांच्या फिर्यादीवरून सोमवारी (दि. 20) कृष्णा, अरुण घुगे (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर दोन अनोळखी इसमांविरुद्ध रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अनुराग जैन आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे हे करीत आहेत.