पुणे (संजय कडू) – सायबर भामटे नागरिकांचे डमी फेसबुक अकाउंट तयार करून आर्थिक फसवणूक करीत आहेत. भामटे तुमचे प्रोफाइल फोटो आणि तुमचे नाव वापरून नवीन फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे तुमच्या मित्रांना त्या अकाउंटमध्ये जोडण्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहेत. अशी रिक्वेस्ट स्वीकारताच एखाद्या दिवशी अचानक अडचणीत असल्याचे सांगत पाच ते दहा हजारांची मागणी केली जात आहे. तुमच्या फ्रेंड लिस्टमधले पाच ते दहा व्यक्ती जरी गळाला लागल्या तरी सायबर भामटा एका डमी फेसबुक अकाउंटद्वारे एकावेळी 50 हजार ते एक लाख रुपये लुबाडत आहेत.
…फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका
माझ्याकडे नवीन फेसबुक खाते उघडण्याचे कोणतेही कारण नाही, कृपया काळजी घ्या आणि माझ्या नावाने नवीन अकाउंटवरून येणारी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. माझ्या खात्यावरून अश्लील, जातीयवादी किंवा पैसे मागणारा मेसेज आला तर त्यावर विश्वास ठेवू नका, मागील काही दिवसांत तुम्हालाही तुमच्या मित्राला असा एखादा मेसेज आला असेल. यावरूनच सायबर भामट्यांनी पसरलेल्या जाळ्यात आपला मित्र किंवा नातेवाईक सहजासहजी अडकला असल्याचे समजावे. यावरून आपणही आपल्या फेसबुक खात्याची सुरक्षितता तपासून पहावी.
“आपण ओळखीच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास कोणताही विचार न करता लगेचच स्वीकारतो. मात्र, हेही पाहिले जात नाही की तो अगोदरच आपल्या फ्रेंडलिस्टमध्ये आहे का, तरीही त्याने पुन्हा रिक्वेस्ट का पाठवली असेल? याची विचारणा आपण त्याला करत नाही. उलट आपणच स्वत: विचार करतो की त्याने नवीन खाते उघडले असेल. यातून पुन्हा अशी रिक्वेस्ट स्वीकारतो, ते टाळावे.”
– मच्छिंद्र पंडित, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन
“फेसबुकवर सिक्युरिटीचा ऑप्शनवर जावे. तेथे योग्य ती सुरक्षाविषयक सेटींग करावी. जेणेकरून आपले फोटो, फोन नंबर व इतर गोष्टी कोणाला वापरता येणार नाहीत. आपल्या फेसबुक खात्याचा ऍक्सेस पब्लिक असेल तर आपली वैयक्तिक माहिती, फोन नंबर व फोटा खात्यावर ठेवू नयेत.”
– डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन