- एकाच दिवसात 235 जणांना लागण
- उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली
पिंपरी – दिवाळीनंतर शहरामध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेस रोखण्यास प्रशासनाला यश आले. त्यानंतर शहरामध्ये लसीकरणाची मोहीमही सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये करोनाबाबत निर्धास्तपणा आला आहे. करोनाचा आलेख खाली जात असतानाच आता त्यामध्ये पुन्हा वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. आज शहरामधील करोना बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढला असून शहरामध्ये 235 बाधितांची नोंद झाली आहे. तर उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
शहरामध्ये 10 फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. 10 फेब्रुवारीला शहरामध्ये 137 बाधितांची संख्या होती. तर उपचाराधीन असलेले रुग्ण 1764 होते. पाच दिवसांमध्ये त्यामध्ये भर पडून उपचाराधीन असलेल्या रुग्णांच्या संख्येने 15 फेब्रुवारीला 2 हजारचा आकडा पार केला. यादिवशी शहरामध्ये 100 नवीन रुग्णांची भर पडून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 2014 इतकी झाली. मंगळवारी त्यामध्ये 142 नवीन रुग्णांची नोंद होऊन 2120 सक्रिय रुग्ण झाले. तर आज तब्बल शहरामध्ये 235 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
बुधवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरातील 227 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 8 रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंत शहरामध्ये 1 लाख 2 हजार 237 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरामध्ये 2598 इतक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1827 तर शहराबाहेरील 771 रुग्णांचा समावेश आहे.
दिवसभरात 34 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 98 हजार 97 इतकी झाली आहे. करोनाप्रती नागरिकांमधील भीती कमी झाली आहे. त्यामुळे सुरक्षेसाठीचे सर्व नियम नागरिक धाब्यावर बसवत आहेत. त्याचा परिणाम शहरातील रुग्णांच्या वाढत्या संख्येवर झाली असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुग्णालयाच्या दुप्पट करोनाबाधित घरी शहरात एकूण उपचाराधीन करोनाबाधित रुग्णांची संख्या 2313 इतकी आहे. त्यापैकी केवळ 781 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 1532 इतकी आहे. घरी उपचार घेणारे आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या नागरिकांनी खरोखर स्वत:स होम क्वॉरंटाइन केले आहे का ? याकडे पालिकेने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सुरुवातीच्या काळात घरी असलेल्या रुग्णांवर आणि होम क्वॉरंटाइन केलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली होती.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नियमांची ऐशीतैशी
शहरामध्ये लग्न, राजकीय कार्यक्रम, सभा मर्यादित संख्येमध्ये घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्याचा गैरफायदा घेत अनेकांनी मोठ्या प्रमामावर लग्न सोहळे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त वाढदिवस व इतर कार्यक्रम देखील कोणतीही काळजी न घेता साजरे केले जात आहे. यामध्ये सामाजिक अंतराचे पालन केले जात नाही. मास्क वापरला जात नाही. त्यामुळे संक्रमणाचे प्रमाण वाढले आहे.
वातावरण बदलाचाही परिणाम
मागील काही दिवसांमध्ये शहरामध्ये वातावरणामध्ये बदल झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, थंडी ताप याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये येणाऱ्या ओपीडीमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
जिल्हा रुग्णालयात 12 करोनाबाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात बुधवारी (दि.17) नव्याने 12 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, करोनामुक्त झालेल्या 6 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
करोनाबाधितांमध्ये कडा (जि. बीड), वाकड, वाल्हेकरवाडी, सांगवी, पिंपळी जगताप (ता. शिरूर), देहूगाव (ता. हवेली), सासवड, नसरापूर (ता. भोर) येथील रुग्ण आहेत. 7 पुरुष आणि 5 महिला रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. करोनामुक्त झालेल्या 6 रुग्णांमध्ये 5 पुरूष आणि एका महिला रुग्णाचा समावेश आहे. पिंपळे जगताप (ता. शिरूर), मधुबन सोसायटी-जुनी सांगवी आणि शिरूर येथील हे रुग्ण आहेत. रुग्णालयात सध्या 24 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 763 जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
गेल्या सात दिवसांतील शहरातील रुग्णांची स्थिती
दिनांक रुग्ण मृत्यू उपचाराधीन
10 फेब्रुवारी-137-01-1764-
11 फेब्रुवारी-134-01-1763-
12 फेब्रुवारी-117-00-1771-
13 फेब्रुवारी-132-01-1851-
14 फेब्रुवारी-158-01-1973-
15 फेब्रुवारी-104-00-2014-
16 फेब्रुवारी-142-00-2120-
17 फेब्रुवारी-235-00-2313-