-->

चाकणमध्ये कामगारांसाठी उभारणार ईएसआय रुग्णालय

  • एमआयडीसी देणार भूखंड
  • राज्यात दहा ठिकाणी ईएसआय रुग्णालयांचे नियोजन

पिंपरी – औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून ईएसआय रुग्णालये उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे 10 ठिकाणी भूखंड उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये इएसआय रुग्णालय उभारले जाणार आहे.

औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांना आरोग्यविषयक सेवा-सुविधा पुरविण्याचे काम ईएसआयच्या रुग्णलयामार्फत करण्यात येते. रुग्णालय उभारण्यासाठी मागणीप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये चाकण सिन्नर, तळोजा, पालघर, जळगाव, औरंगाबाद, रायगड, रोहा, तसेच सातारा व पनवेल येथे भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कामागारांना आता रजा अथवा विनावेतन रजा घेण्याची आवश्‍यकता भासणार नाही.

पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव याठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षेअंतर्गत व्यवस्थापनाकडून ईएसआय सुविधा पुरविली जाते. पुणे जिल्ह्यात चिंचवड, मोहननगर येथे ईएसआयचे सुसज्ज रुग्णालय आहे. मात्र, त्याठिकाणी गंभीर आजारांवरील उपचारांची सोय नाही. तर बिबवेवाडी येथील कार्यालयात केवळ आंतररुग्ण विभाग कार्यरत असून, या रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा दर्जा मिळूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तर ईएसआयकडून नगररोड, हडपसर आणि भोसरीमध्ये कामगारांना डिस्पेन्सरी सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणारे सुमारे दहा लाख कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य विमा कर्मचारी योजनेचे कवच आहे. मात्र, ईएसआयकडून दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याची कायम ओरड आहे. एखादा कामगार वैद्यकीय उपचारांकरिता मोहननगर येथील रुग्णालयात गेला असता, त्याची तपासणी होऊन, पुढील उपचाराकरिता पिंपरीतील वायसीएम रुग्णालय अथवा पुण्याच्या ससूनला दाखल करण्याची रेफरचीट दिली जाते. मात्र, असेदेखील ही रुग्णालये सर्वांसाठी कायम खुली असतात. त्यामध्ये मोहननगर रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यासाठीचा अधिक वेळ खर्ची का करायचा? असा प्रश्‍न कामगारांकडून विचारला जात आहे. त्यामुळे चाकणमध्ये नव्याने उभारणारे रुग्णालय हे सुपरस्पेशालिटी दर्जाचे असावे, अशी कामगारांची मागणी आहे.

मावळ तालुक्‍यातील सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये ईएसआय योजनेतील कामगारांवर उपचार केले जातात. तर आपत्कालीन परिस्थितीत अन्य खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या कामगारांकडे मोठी रक्कम मागितली जात असल्याने, मोहननगरमधील रुग्णालयात येण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे कामगारांसाठी ईएसआयने ही सुविधा कॅशलेस स्वरुपात उपलब्ध करुन द्यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत.
अर्जुन चव्हाण, पुणे जिल्हाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ

 

जिल्ह्यातील सुमारे दहा लाख कामगारांच्या वेतनातून कपात होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या मोबदल्यात मोहनगरमधील ईएसआय रुग्णालयात मिळणारे वैद्यकीय उपचार सुमार दर्जाचे आहेत. चाकणमध्ये ईएसआयने जरुर सुपरमल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारावे; मात्र दर्जेदार उपचारांकरिता मोहननगर रुग्णालयाचेदेखील सक्षमीकरण करावे.
– यशवंत भोसले
अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.