पुणे – राज्यात सोमवारी आणखी दोन जण “ओमायक्रॉन’ बाधित आढळले. त्यातील एक महिला पुणे, तर दुसरी व्यक्ती लातूरमध्ये आहे. दोघेही दुबईहून प्रवास करून आले आहेत. यांचा समावेश करून राज्यातील “ओमायक्रॉन’ बाधितांची संख्या आता 20 झाली आहे.
पुण्यातील बाधित महिला 39 वर्षीय आहे तर लातूरमधील पुरुष 33 वर्षीय आहे. दोघेही लक्षणे विरहित असून, दोघांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दोघांचेही करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या बाधितांच्या निकटवर्तीयांपैकी प्रत्येकी तीन जणांची “आरटी-पीसीआर’ टेस्ट केली असून, ती निगेटिव्ह आली आहे.
दरम्यान आजपर्यंत मुंबईत पाच, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे महापालिका हद्दीत दोन, कल्याण-डोंबिवली, लातूर आणि नागपूर येथे प्रत्येकी एक “ओमायक्रॉन’ बाधित रुग्ण आढळला आहे.