पुणे – आरोग्य विभाग पेपर फुटीप्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सायबर पोलिसांनी चौघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी या चौघांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, अटक करण्यात आलेला नौदल खलाशी प्रकाश मिसाळ हा टीईटी, पोलीस भरतीसह इतर परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवणाऱ्या एजंटच्या संपर्कात होता. त्याने आरोग्य विभाग गट “ड’च्या पेपरव्यतिरिक्त अन्य कोणकोणत्या परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवून ते परीक्षार्थींना वाटले आहेत, याचा पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोग्य विभागातील सहसंचालक महेश बोटले (53, रा. मुंबई) यांच्यासह शिक्षक नामदेव करांडे (33, रा. बीड), उमेश मोहिते (24, रा. उस्मानाबाद) आणि प्रकाश मिसाळ (40, रा. मावळ) यांच्या कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी न्यायालयास या तपासाच्या गुन्ह्याची माहिती दिली. या गुन्ह्यातील एजंट बुढे आणि जायभाय अद्याप फरार आहेत.
त्यांचा शोध घेण्यासाठी मिसाळ याच्याकडे चौकशी करायची आहे. बोटले यांच्या विभागातील पेपर सेट करणाऱ्या समितीतील इतर सदस्य लाभार्थी आहेत का ? याचा तपास त्यांच्याकडे करायचा आहे. करांडे आणि मोहिते यांनी लाखो रुपये देवून लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे (50, रा. लातूर) यांच्या चालकाकडून फुटलेला पेपर मिळवला, असे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयास सांगितले. याबाबत तपास करण्यासाठी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी ऍड. जाधव यांनी केली.