लंडन – करोनाच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे ब्रिटनमध्ये पहिला मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आज याची अधिकृत घोषणा केली आहे.
ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा धोका सर्वाधिक म्हणजे श्रेणी 4 पर्यंत म्हणजे सर्वाधिक पातळीवरचा देण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये या श्रेणीचा इशारा यापूर्वी मे महिन्यात देम्यात आला होता. आता पुन्हा ओमायक्रॉनमुळे देशात करोनाची मोठी लाट येण्याची शक्यता आहे, असे जॉन्सन यांनी पूर्वीच म्हटले होते.
ओमायक्रोनमुळे देशात लसीकरणाबरोबरच बुस्टर डोस अनिवार्य करण्यात येईल, असेही बोरीस जॉन्सन यांनी केले होते. करोनाच्या लसीतील हा तिसरा डोस या आठवड्यापासून इंग्लंडमध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींना दिला जाणार आहे. दुसरा डोस घेऊन 3 आठवडे झालेल्या सर्व व्यक्तींना हा डोस दिला जाणार आहे. करोनाचे दोन डोस करोनाला रोखण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे बुस्टर डोस घ्यावाच लागणार आहे, असे जॉन्सन म्हणाले.
ओमायक्रॉनला तोंड देण्यासाठी “प्लॅन बी’ तयार करण्यात आला आहे. आता सोमवारपासून लोकांना “वर्क फ्रॉम होम’ सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे.
जर आवश्यक ती उपाय योजना केली गेली नाही, तर ब्रिटनमध्ये पुढील वर्षी एप्रिलपर्यंत 25 हजार ते 75 हजार करोना रुग्णांचा मृत्यू होईल, असा अंदाज आहे. 2021 मध्ये दररोज 2 हजार रुग्ण सापडत होते. 1 लाख 75 हजार जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. तर 24 हजार जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी 2021 मध्ये करोनामुळे ब्रिटनमध्ये जितकी हानी झाली होती, त्यापेक्षा अधिक हानी ओमायक्रॉनमुळे होईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.