मुंबई – नामिबियात होत असलेल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये पाकिस्तानशी खेळण्यासाठी बंगाल संघ रवाना होणार होता. मात्र, या संघाला पाकिस्तानशी खेळण्यासाठी बीसीसीआयने परवानगी नाकारली आहे. आयसीसीच्या अधिकृत स्पर्धा वगळता अन्य कोणत्याही स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानशी खेळू शकत नसल्याने आता आयोजकांपुढे कोणत्या संघाला आमंत्रण द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बंगालचा संघ नामिबिया येथे एका ग्लोबल टी-20 स्पर्धेत सहभागी होणार होता. बीसीसीआयने बंगालच्या संघाला या स्पर्धेत खेळण्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे बंगालच्या संघाने या स्पर्धेतून आपला सहभाग काढून घेतला आहे. बीसीसीआय भारतीय संघातील खेळाडूंनाही परदेशातील टी-20 स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. बंगालच्या संघाला परवानगी नाकारण्यामागे हेच कारण आहे.
अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांनी आपल्या खेळाडूंना अन्य देशांत होत असलेल्या विविध टी-20 लीग स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशी परवानगी बीसीसीआयने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटू दुसऱ्या देशाच्या टी 20 स्पर्धांमध्ये खेळत नाही. नामिबियात होणाऱ्या या स्पर्धेत बंगालचा संघ नामिबिया, पाकिस्तान सुपर लीगची टीम लाहोर कलंदर्स आणि दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक संघाविरुद्ध खेळणार होता. 1 ते 9 सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आता बंगालने या स्पर्धेतून नाव मागे घेतले आहे.
परवानगी घेतली नव्हती
बंगाल क्रिकेट संघटनेने या स्पर्धेसाठी बीसीसीआयची परवानगी घेण्यापूर्वीच आपल्या संघाची घोषणा केली होती. या संघात आकाशदीप, मुकेश कुमार, इशान पोरेल, शाहबाज अहमद, रितिक चॅटर्जीला संघात स्थान दिले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची तयारी करण्याचा नामिबियाचा प्रयत्न होता. टी-20 विश्वकरंडक स्पर्धा यंदा ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. या स्पर्धेत सुपर-12 मध्ये पात्र होण्यात नामिबियाचा संघ यशस्वी ठरला आहे. यापूर्वी 2003 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत नामिबियाचा समावेश होता. मात्र, त्यानंतर त्यांना या स्पर्धेची पात्रता मिळवता आलेली नव्हती.