बारामती (प्रतिनिधी) – शहरातील भिगवान रोडवर हॉटेल अभिषेक समोर झाड कोसळल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला होता. सायलीहिल येथील नागरिकांनी ही बाब एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचे सदस्य असलेले मंगेश ओमासे यांच्या निदर्शनास आणली त्यानंतर तत्परतेने मंगेश ओमासे व त्यांच्या मित्रपरिवाराने रस्त्यावर कोसळले झाड बाजूला करत वाहतूक व्यवस्था सुरळीत करून दिली.
शहरातील भिगवण रस्त्यावर अचानक झाड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. सायलीहिल येथील नागरिकांनी मंगेश ओमासे यांना फोन करून सांगितले. त्यानंतर मंगेश ओमासे व त्यांचे सहकारी विजय गोंडे, प्रतीक जगताप तेथे पोहोचले त्यानंतर इतर काही नागरिकांच्या मदतीने त्यांनी रस्त्यावरील झाड बाजूला केले.
याबाबत बारामती नगर परिषदेतील उद्यान विभागाशी त्यांनी संपर्क साधला. उद्यान विभागाचे मज्जिद पठाण व इतर कर्मचारी देखील तेथे दाखल झाले. त्यांनी वाहतुकीस अडथळा ठरत असलेली झाडांचा धोकादायक फांदी तोडली व वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.