जळोची -झटपट पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी रक्त पुरवठा नियंत्रित करणारी इंजेक्शन अवैध पद्धतीने जिममध्ये विकणाऱ्यास बारामती पोलिसांनी गजाआड केले आहे.
प्रदीप सुरेश सातव (रा. कसबा, बारामती) असे या आरोपीचे नाव आहे. सातव हा जिमसाठी जाणाऱ्या लोकांना शरीर पिळदार होते, असे सांगून इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा रचून सातव यास त्याची चारचाकी गाडी (एमएच 02 डीझेड 7286) सह पकडून त्याची व गाडीची झडती घेतली असता एकूण 20 इंजेक्शन बॉटल मिळून आले आहेत. हे इंजेक्शन सर्जरी केल्यानंतर रक्तपुरवठा नियंत्रित करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते; परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम केलंनंतर सुस्ती न येण्यासाठी केला जातो. हे औषध शरिरावर दुष्परिणाम करणारे असलेचे औषध निरीक्षक यांनी सांगितले आहे. अशी औषधे ही कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली जात नसून ते बारामतीमधील जिमला विकले जात होती. पोलिसांनी तात्काळ औषध निरीक्षक यांना बोलावून ही औषधे पोलीस व औषध निरीक्षक प्रशासनाने जप्त केली आहेत.
ही कारवाई ही अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, गणेश पाटील, युवराज घोडके, संजय जगदाळे पोहवा रामचंद्र अभिजित कांबळे, दशरथ कोळेकर, अजित राउत, दशरथ इंगोले, सचिन कोकणे, मनोज पवार यांनी केली आहे.
– साडेनऊ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
आरोपी सातव याच्याकडून कडून 268 रुपये प्रमाणे 20 बॉटल्स किंमत अंदाजे 5,360 रुपये तसेच 9 लाख किंमतीची चारचाकी असा एकूण 9 लाख 35,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ही औषधे कोठून आणली व अजून कोणाकोणाला विकली आहेत, याचा पुढील तपास सहायक पोलीस निरक्षक गणेश पाटील हे करीत आहेत.
-पिळदार शरीसयष्टीसाठी काय पण
तरुण पिढीमध्ये पिळदार शरीरयष्टी बनवण्याचे वेड वाढलेले आहे. त्यासाठी काही ही करावयाची तरुणवर्गाची तयारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेणे, काही इंजेक्शन घेणे यासारखे प्रकार केले जात आहेत. परंतु त्याचा दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो. शरीराची खूप मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. मध्यंतरी काही बॉडीबिल्डर लोकांचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचे लोन आता ग्रामीण भागात सुद्धा पसरत आहे.