नगर परिषदेने 18 लाख भरण्यास सर्वच नगरसेवकांचा विरोध
बारामती – बारामतीत ज्या ठेकेदारांनी काम केले; मात्र त्यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कमच भरलेली नाही, अशा ठेकेदारांची जवळपास 18 लाखांची रक्कम नगर परिषदेने भरण्यास सर्वच नगरसेवकांनी एकमुखी विरोध केला. यात मुख्याधिकारी योगेश कडूसकर हे नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
बारामती नगर परिषदेत गुरुवारी (दि. 2) झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयाला मंजुरी देण्यात आली. तर अनेक विषयांवर खंडाजंगीही झाली. दरम्यान, ठेकेदारांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कमच भरली नसल्याचे समजताच गटनेते सचिन सातव, किरण गुजर, सुनील सस्ते, संजय संघवी, गणेश सोनवणे, विष्णुपंत चौधर यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी संबंधित कंत्राटदारांकडून ही रक्कम वसूल करून भरावी, नगर परिषदेने ही रक्कम भरण्याचे कारण नाही, अशी ठाम भूमिका मांडली.
जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठवावा, जिल्हाधिकाऱ्यांनी जर ही रक्कम भरण्यास मान्यता दिली तरच ही रक्कम नगर परिषदेने भरावी, असा निर्णय झाला. या प्रकरणात संबंधित विभागाच्या आयुक्तांनी नगर परिषदेची खाती गोठविण्याचा इशारा दिल्याचा उल्लेख करीत किरण गुजर व सचिन सातव यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मतानुसार यात निर्णय करावा, असे नमूद केले.
“शाळांचे पालकत्व स्वीकारा’ दिव्यांग लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासोबतच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दिव्यांग लाभाधारकांना प्रति लाभार्थी तब्बल एक लाख रुपयांची रक्कम नगर परिषदेकडून भरण्यास सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यासोबतच नगरसेवकांनीही या शाळांचे पालकत्व स्वीकारावे, असे आवाहन नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सर्वाधरणसभेत केले.
“ती कामे उक्ते स्वरुपात द्या’ स्मशानभूमी व दफनभूमी तसेच उद्यान यांचे वार्षिक ठेके देताना त्यांचे काम एकत्र करुन उक्ते या स्वरुपात दिले तर नगर परिषदेची बचत होईल, अशी सूचना संजय संघवी यांनी मांडली, सर्वच सदस्यांनी त्यांना अनुमोदन दिले, त्या स्वरुपातच हे काम व्हावे, असे सर्वांनी मत व्यक्त केले.
प्रशासनावर ओढले आसूड बांधकाम मजूर नोंदणी प्रमाणपत्रांबाबतही संजय संघवी यांनी संतप्त होत एक कार्यकर्ता रस्त्यावर स्टॉल लावून असे प्रमाणपत्र देत असेल तर नगर परिषदेत इतके कर्मचारी असताना हे प्रमाणपत्र देऊ शकत नाही, याची तुम्हाला लाज वाटायला हवी, अशा शब्दात प्रशासनावर आसूड ओढले.
दवे एजन्सीचे काम रद्द करा
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किती प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे, याची चौकशी नगरसेवकांनी केल्यानंतर दवे नावाचे कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करीत असून त्यांचे देणे रोखून धरावे असे पत्रच मुख्याधिकाऱ्यांना दिल्याचे किरण गुजर यांनी सांगितले. सचिन सातव, गणेश सोनवणे, सत्यव्रत काळे यांनीही या प्रकरणात दवे ही एजन्सी गेल्या दोन वर्षांपासून कामकाजच करीत नसल्याने त्यांचे काम रद्द करावे, अशी मागणी केली.
… तेव्हा जागा विकसित करू शकता
शहरातील प्रतिभा नगर, वडके नगर, तांदुळवाडी या ठिकाणचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी त्या भागामध्ये लोक राहत असलेल्या जागेचे पट्टे आखून दिल्यानंतर भोगवटा वर्ग 2 तिथे राहणाऱ्या लोकांच्या नावावरती राहत्या घराच्या जागेचा सातबारा तयार झाल्यानंतर त्या भागातील लोक एकत्र येऊन ती जागा डेव्हलप करू शकतात का? असा सवाल उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी उपस्स्थित केला.
त्यावर मुख्याधिकारी योगेश कडूसकर म्हणाले की, पट्टे आखून दिल्यानंतर व भोगवटा वर्ग 2 म्हणून त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या नावावरती सातबारा झाल्यानंतर त्याठिकाणी लोक एकत्र येऊन नगर परिषदेकडून मंजुरी घेऊन त्या ठिकाणची जागा विकसित करू शकतात.