आळेफाटा, (वार्ताहर) – वडगाव आनंद (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीतून नगर-कल्याण महामार्गालगत वटवृक्षाला आग लागून खाक झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नगर-कल्याण महामार्गालगत असणार्या वटवृक्षाला रविवारी (दि. 24) रात्री 11.30 सुमारास आग लागून मोठ्या स्वरूपात पेट घेतला. ही घटना ग्रामपंचायत सदस्य गणेश भुजबळ यांना समजताच प्राथमिक उपाययोजना म्हणून नागरिकांना जमा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. गणेश भुजबळ यांनी आगीची दाहता लक्षात घेऊन समयसूचकता म्हणून जुन्नर नगरपरिषदेच्या अग्निक्षामक पथकाला पाचारण केले.
तोपर्यंत शर्तीचे प्रयत्न करण्याकामी उपसरपंच ऋषिकेश गडगे, संदीप गडगे, गोरख देवकर, सोमनाथ गडगे, संतोष पादिर, प्रफ्फुल इथापे, सदस्या वैशाली देवकर, वायरमन नितीन चौगुले, ग्रामस्थ ऋषिकेश वाळुंज, डॉ. संजय देवकर आदींनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते.
दरम्यानच्या कालावधीत अग्निक्षण दलाची गाडी दाखल झाल्याने भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. दरम्यान, समयसूचकतेमुळे शेजारी असणारे राहते घर आगीपासून बचावल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
वडगाव आनंदनध्ये अग्निशामक गाडी हवी
वडगाव आनंद या ग्रामपंचायत हद्दीत वडगाव आनंद, आळेफाटा तसेच पदिरवाडी ही गावे असून मोठ्या प्रमाणात होत असलेले आळेफाटा व वडगाव आनंद शहराचे विस्तारीकरण पाहता वडगाव आनंद ग्रामपंचायत कार्यालयाने स्वतंत्र असे अग्निक्षामक गाडीची व्यवस्था व्हावी, अशी नागरिक व व्यापारी वर्गाकडून मागणी होत आहे.