मुंबई – गौतम अदानी यांच्या ताब्यात असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचे हेरॉईन ड्रग्ज सापडल्यानंतर अदानी समुहाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील मालवाहू जहाजांना अदानी नियंत्रित बंदरांवर प्रवेशबंदी असेल. याची अंमलबजावणी 15 नोव्हेंबरपासून होणार आहे.
अदानी समुहाने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. हा नियम अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व बंदरांना लागू असेल. पुढील नोटीस येईपर्यंत या तीन देशांमधून येणाऱ्या जहाजांना अदानी पोर्टवर बंदी असेल.
गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर 16 सप्टेंबर रोजी अंदाजे 3 हजार किलो वजनाचे हेरॉईन (ड्रग्ज) जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 20 हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. तालिबान आणि आयएसआयशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
डीआरआय महसूल गुप्तचर संचालनालयने ड्रग्ज तस्करी प्रकरणात ही जगातील सगळ्यात मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर डीआरआयकडून अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्लीपर्यंत छापेमारी करण्यात येत आहे. या तस्करीचे धागेदोरे हे अफगाणिस्तानात असल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत.