पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने दिनांक 11 ऑक्टोबरपासून आपला रेपो लिंक्ड व्याजदर हा 6.90 % वरून 6.80 % म्हणजेच 0.10 टक्क्याने घट केली आहे. बॅंकेकडून गृहकर्ज, चारचाकी वाहन, शैक्षणिक, व्यक्तिगत कर्ज तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना ह्या घटलेल्या व्याजदराचा लाभ घेता येईल.
त्याच प्रमाणे एमसीएलआरमध्ये सुद्धा 0.10 टक्क्याने घट करून तो 6.70 % करण्यात आला आहे. एक दिवसासाठी तो 6.70 %, एक महिना मुदतीसाठी 6.80 %, 3 महिन्यांसाठी 7.10 % आणि 6 महिने मुदतीसाठी 7.15 % निर्धारित करण्यात आला आहे.
अगोदरच बॅंकेने गृह कर्ज, चारचाकी वाहन कर्ज, आणि सोने तारण कर्ज यावरील प्रक्रिया शुल्क बॅंकेने माफ केले आहे. आता आरएलएलआरमध्ये घट केल्यामुळे गृहकर्जाचा व्याजदर हा 6.80 %, चारचाकी वाहन कर्जाचा व्याजदर 7.05 % व सोने तारण कर्जाचा व्याजदर 7.00% झाला आहे.
आरएलएलआरमध्ये घट केल्यामुळे आणि प्रक्रिया शुल्क माफ केल्यामुळे गृह कर्ज, चारचाकी वाहन कर्ज, आणि सोने तारण कर्ज घेणाऱ्या बॅंकेच्या ग्राहकांना ती कर्जे घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असा विश्वास बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव यांनी व्यक्त केला.