कोपनहेगन – ब्रिटनच्या ऑक्स्फर्ड विद्यापीठाने आणि ऍस्ट्राझेनेकाने विकसित केलेली आणि भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादन केल्या जात असलेल्या लसीचा डेन्मार्क, नॉर्वे आणि आइसलंड या तीन देशांनी वापर थांबवला असल्याची बातमी आहे. काही जणांना लस दिल्यानंतर विपरीत परिणाम आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतात करोना विरोधी लसीकरणात सीरमच्या कोविशिल्डचा वापर करण्यात येत असून ज्या रूग्णांना काही त्रास झाला आहे अन त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे किंवा लसीकरणानंतर ज्यांचा मृत्यू झाला आहे अशा व्यक्तींच्या अहवालांचा तज्ञांच्या समितीकडून अभ्यास सुरू आहे असे सांगण्यात आले.
यासंदर्भात जे पॅनल तयार करण्यात आले आहे, त्याचे प्रमुख नरेंद्र आरोरा यांनी सांगितले की तीन देशांनी जो निर्णय घेतला आहे, त्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. लस घेतल्यानंतर रक्ताची गुठळी निर्माण झाल्याचा काही प्रकरणांत दावा करण्यात आला असून त्याचा अभ्यास केला जातो आहे. दरम्यान अशा घटनांचा आम्हीही अभ्यास करत असून त्यावर आमचे लक्ष असल्याचे युरोपीयन औषध नियामकांनी म्हटले आहे. लस घेतल्यानंतर अशी रक्ताची गुठळी निर्माण होण्याचे प्रमाण किती आहे याच्याकडेही लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डेन्मार्कमध्ये एका 60 वर्षीय महिलेला कोविशिल्डची ऑस्ट्रीय बॅचची लस देण्यात आली होती. रक्तात गुठळी निर्माण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर त्या देशाने पंधरा दिवसांसाठी ही लस देण्याचे थांबवले आहे. लसीमुळेच त्या महिलेचा मृत्यू झाला का, हे आताच सांगता येउ शकत नाही. मात्र चौदा दिवसांसाठी ही लस थांबवण्यात आल्याचे डेन्मार्कच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. नॉर्वेनेही खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. लसीकरण पुन्हा केव्हा सुरू करणार याबाबत काही सांगण्यास त्यांनी नकार दिला.
ऑस्ट्रीयानेही पहिले असाच निर्णय घेतला असून इटलीनेही तसे करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, मानवी चाचण्या घेताना लसीच्या सुरक्षिततेबाबत पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. लसीमुळे कोणतेही साइड इफेक्ट नसल्याचा डेटाही उपलब्ध असल्याचे ऍस्ट्राझेनेकाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.