नवी दिल्ली – दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा दर 129 रुपयांनी वाढून 46,286 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 120 रुपयांनी कमी होऊन 60,369 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
रुपया कमकुवत झाला आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारात सोन्याचे दर काही प्रमाणात वधारल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1757 डॉलर व चांदीचा दर 22.56 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. जागतिक पातळीवर महागाई वाढत आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्था सुधारत आहे. त्यामुळे विविध बाजारांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाले आहे.
त्यामुळे धातू बाजारातही अस्थिरता रेंगाळण्याची शक्यता आहे. मात्र भारतामध्ये बरेच सण येणार असल्यामुळे आगामी काळात भारतात विक्री वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.