मुंबई – बंद खोलीत कधीच आश्वासन देत नाही. सगळे उघडपणे करतो, असे म्हणणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शिवसेनेकडून जोरदार पलटवार करण्यात आला. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेच्या अंधारातला शपथविधी उघडपणाच्या कोणत्या व्याख्येत बसतो, असा बोचरा सवाल त्या पक्षाने केला.
शहा यांनी नुकताच कोकण दौरा केला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचा कुठलाही शब्द बंद खोलीत देण्यात आला नव्हता, असा दावा केला. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरूनच भाजप आणि शिवसेनेतील प्रदीर्घ राजकीय युती तुटली.
त्या पार्श्वभूमीचा संदर्भ घेऊन शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून शहा यांच्या दाव्याचा समाचार घेण्यात आला. शिवसेनासुद्धा जे काही करते; ते उघडपणे करते. तसे नसते तर आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर उघडपणे सत्ता स्थापन केली नसती.
भाजपच्या वाटेने शिवसेना जात राहिली असती, तर आजचा सुवर्ण कळस कधीच दिसला नसता. परमेश्वराची कृपा म्हणून भाजपला शब्द फिरवण्याची दुर्बुद्धी सुचली आणि शिवसेनेस अच्छे दिन दिसले, अशी भूमिका अग्रलेखातून मांडण्यात आली आहे.