सिलिगुडी – सीमा सुरक्षा दलाने भारतीय हद्दीत घुसलेल्या बांगलादेशी पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. तथापि चौकशी करून त्याला नंतर बांगलादेश पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मोहंमद शेख सोहेल राणा असे या 46 वर्षीय अधिकाऱ्याचे नाव आहे, तो निरीक्षक दर्जाचा अधिकारी आहे. ढाका पोलिसांच्या सेवेत तो कामाला आहे.
शुक्रवारी भारतीय हद्दीत संशयास्पदरित्या फिरत असताना त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या जवळून चार डेबीट कार्ड, दोन फोन आणि काही विदेशी चलन सापडले आहे. काठमांडूला जाण्याच्यासाठी आपण भारतीय हद्दीत आलो होतो, असे त्याचे म्हणणे होते.
सीमेवर काही जणांना दहा हजार बांगलादेशी टाका देऊन त्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला होता अशी माहिती मिळाली आहे. तो ढाक्याहून 2 सप्टेंबरला बसने पतग्रामला आला. हे ठिकाण सीमावर्ती भागात लालमोनीरहाट जिल्ह्यात आहे. तेथून तो शुक्रवारी दुपारी भारतीय हद्दीत घुसला होता.