पेशावर – अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमे नजिकच्या क्वेट्टा शहरानजिक आत्मघाती पथकातील एका दहशतवाद्याने घडवलेल्या स्फोटात पाकिस्तानच्या निमलष्करी दलातील चार जवान ठार झाले असून अन्य काही जण जखमी झाले आहेत. क्वेट्टा जवळच्या मियाघुंडी भागात तैनात असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठीच हा आत्मघाती हल्ला झाल्याचे सांगण्यात येते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या स्फोटात एकूण 19 जण जखमी झाले असून त्यात 17 जवानांचा समावेश आहे. त्यातील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. क्वेट्टाचा परिसर हाजरा समुदायाचे मुख्य निवासाचे ठिकाण आहे. तेथे हाजरा समाजाची सुमारे पाच लाख लोकसंख्येची वस्ती आहे. दुसऱ्या एका समाजाच्या गनिमांकडून हाजरा समुदयाला कायम लक्ष्य केले जाते. त्यातून तेथे अनेक वेळा आत्मघाती हल्ले झाले आहेत.