मुंबई – माजी कर्णधार विराट कोहलीसह प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतरही शेर्फन रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक व हर्षल पटेल यांनी केलेल्या फलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने आयपीएल स्पर्धेत बुधवारी अखेरच्या षटकापर्यंत झालेल्या रोमहर्षक लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा 3 गडी राखून पराभव केला.
कोलकाताने विजयासाठी दिलेल्या 129 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूच्या डावाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर अर्जुन रावत व कर्मधार फाफ डुप्लेसी व माजी कर्णधार विराट कोहली बाद झाले तेव्हा संघाची धावसंख्या 3 बाद 17 होती. वेगवान गोलंदाज उमेश यादवने बेंगळुरूला चांगलेच अडचणीत आणले होते. त्यातच टीम साउदीनेही त्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
त्यानंतर डेव्हीड विलीने शेर्फन रुदरफोर्डसह भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विली 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर रुदरफोर्डने शाहबाज अहमदसह संघाचा डाव सावरला. या जोडीने बेंगळुरूला शतकी मजल मारून दिली. शाहबाजने एक षटकार फटकावून सामन्यात रंगत आणली होती.
मात्र, त्यानंतरच्याच चेंडूवर तो यष्टिचीत बाद झाला. त्यानंतर रुदरफोर्ड धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात 28 धावांवर बाद झाला. यावेळी दिनेश कार्तिक व हर्षल पटेल यांनी अत्यंत जबाबदारीने परंतु आक्रमक फलंदाजी केली. कार्तिकने 14 तर, पटेलने 10 धावा करत आठव्या गड्यासाठी 21 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत अखेरच्या षटकांत संघाचा विजय साकार केला. कोलकाताकडून टीम साउदीने 3, उमेश यादवने 2 गडी बाद केले.
तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने वनिंदू हसरंगा, आकाश दीप, हर्षल पटेल व महंमद सिराज यांच्या अत्यंत भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सचा डाव अवघ्या 128 धावांत गुंडाळला. कोलकाताच्या आंद्रे रसेलने आक्रमक खेळी केल्यामुळे त्यांना संघाचे शतक धावफलकावर लावता आले व प्रतिष्ठाही राखता आली.
बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसीने नाणेफेक जिंकत कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. संघाच्या 14 धावा असताना सलामीवीर व्यंकटेश अय्यरला आकाश दीपने बाद केले व तेथून त्यांच्या डावाला खिंडार पडले. आकाश पाठोपाठ हसरंगाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात भरात असलेल्या श्रेयस अय्यरसह सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन व टीम साउदी यांना अडकवले.
त्यानंतर पटेलने सॅम बिलिंग्ज पाठोपाठ आक्रमक फलंदाजी करत असलेल्या रसेलला बाद करत बेंगळुरूच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. आकाश दीपने नितीश राणा व उमेश यादव यांना तंबूचा रस्ता दाखवला.
उमेशने आक्रमक 18 धावा केल्यामुळे संघाला शतकी मजल मारता आली. सिराजने अजिंक्य रहाणेला बाद करण्याची परंपरा पुन्हा एकदा जपली. कोलकाताचा डाव 18.5 षटकांत 128 धावांवर संपुष्टात आला. वरुण चक्रवर्ती 10 धावांवर नाबाद राहिला परंतु त्यांना पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत.
संक्षिप्त धावफलक :
कोलकात नाईट रायडर्स ः 18.5 षटकांत सर्वबाद 128 धावा. (आंद्रे रसेल 25, उमेश यादव 18, वरुण चक्रवर्ती नाबाद 10, वनिंदू हसरंगा 4-20, आकाश दीप 3-45, हर्षल पटेल 2-11, महंमद सिराज 1-25). रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 19.2 षटकांत 7 बाद 132 धावा. (शेर्फन रुदरफोर्ड 28, शाहबाज अहमद 27, दिनेश कार्तिक नाबाद 14, हर्षल पटेल नाबाद 10, टीम साउदी 3-20, उमेश यादव 2-16).