इस्लामाबाद – पाकिस्तानमधील तेहरिक ए लबाईक पाकिस्तान या संघटनेवरील बंदी पाकिस्तान सरकारने हटवली आहे. सरकारविरोधी केलेल्या जोरदार हिंसक आंदोलनापुढे इम्रान खान सरकारला अखेर झुकावे लागले आणि सरकारने या संघटनेला बंदी घातलेल्या संघटनांच्या यादीमधून बाहेर काढले आहे.
वादग्रस्त व्यंगचित्राच्या मुद्द्यावरून फ्रान्सच्या राजदूतांची हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी केलेल्या आंदोलनामुळे तेहरिक ए लबाईक पाकिस्तान या संघटनेवर गेल्यावर्षी एप्रिलमध्ये बंदी घातली गेली होती.
या संघटनेने गेल्या महिन्यापासून पुन्हा एकदा आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सरकारबरोबर झालेल्या होतमिळवणीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. यासाठी संघटनेकडून ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्यामध्ये संघटनेवरील बंदी उठवण्यात यावी, ही देखील एक प्रमुख अट होती असे समजते आहे.
या संघटनेची गोठवलेली बॅंक खाती सरकारने गेल्याच आठवड्यात खुली केली होती. “टीएलपी’च्या हिंसक आंदोलनादरम्यान 10 पोलिसांसह एकूण 21 जण ठार झाले होते.
पंजाब सरकारने ग-ह मंत्रालयाकडे पाठवलेल्या अहवालानंतर या संघटनेवरील बंदी उठवण्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला. पाकिस्तान मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सरकारने “टीएलपी’च्या सुमारे 2 हजार सदस्यांना यापूर्वीच तुरुंगातून मुक्त केले आहे. आता बंदी उठवल्यानंतर ही संघटना सर्व प्रकारच्या राजकीय उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहे. मात्र भविष्यातील सरकारांवर या संघटनेचा मोठा दबाव असणार हे उघड आहे.
तेहरिक ए लबाईकची स्थापना 2015 साली झाली आहे आणि तेंव्हापासून या संघटनेने आतापर्यंत 6 वेळा मोठी आंदोलने केली आहेत. ही आंदोलने प्रामुख्याने इस्लामचे प्रेषित पैगंबर यांच्या बदनामीविरोधी आहेत.