इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये “टिकटॉक’या व्हिडीओ ऍपवरील बंदी पुन्हा उठवण्यात आली आहे. अनैतिक आणि अश्लील व्हिडीओ या ऍपवरून अपलोड केले जाणार नाहीत, अशी ग्वाही “टिकटॉक’ने दिल्यावर पाकिस्तानच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ही बंदी उठवली आहे.
पाकिस्तामध्ये “टिकटॉक’या चीनी ऍपवर चार वेळा बंदी घालण्यात आली होती आणि आता चौथ्यांदा ही बंदी उठवण्यात आली आहे. यापूर्वी अश्लील आणि अनैतिक व्हिडीओ पोस्ट व्हायला लागल्यामुळे जुलै महिन्यात “टिकटॉक’वर बंदी घालण्यात आली होती. तेंव्हापासून या आक्षेपांसंदर्भात “टिकटॉक’च्या व्यवस्थापनाशी चर्चा सुरू होती, असे पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने म्हटले आहे.
“टिकटॉक’वर सातत्याने काही आक्षेपर्ह साहित्य अपलोड करणाऱ्या व्यक्तींवर बंदी घालण्याची हमी देखील “टिकटॉक’ने दिली आहे. “टिकटॉक’वरील साहित्यावर यापुढे देखरेख ठेवली जाईल, असे पाकिस्तान दूरसंचार नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये ऑक्टोबर 2020 मध्ये सर्वप्रथम “टिकटॉक’वर बंदी घातली गेली होती. मात्र ही बंदी 10 दिवसातच उठवण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये पेशावर हायकोर्टाने पुन्हा बंदी घातली. ही बंदी एप्रिलमध्ये उठवण्यात आली होती.
सिंध हायकोर्टाने जूनमध्ये “टिकटॉक’वर बंदी घातली होती. मात्र तीनच दिवसांनी ही बंदी उठवली गेली होती. ऍपवरील 60 लाख अश्लील व्हिडीओ हटवण्यात आल्याचे “टिकटॉक’ने तेंव्हा सांगितले होते.