गोरेवाडा येथे ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नागपुरात घोषणा

नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने अस्वस्थ होऊ नका. आमच्या धमण्यात विदर्भाप्रती प्रेम आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून जागतिक पर्यटकांपुढे स्थानिक संस्कृती मांडायची आहे. गोंडसमुहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्र वन विकास महामंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वने व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या लोकार्पणाप्रसंगी बसविण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण केले. तसेच या उद्यानातील जंबू अस्वलाच्या प्रतिकाचे अनावरण केल्यानंतर उद्यानाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान राजकुमार वाघाने, बिबट तसेच अस्वलाच्या पिल्लांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.

मुख्यमंत्री म्हणाले, विदर्भाच्या विकासाबद्दल सरकार कटिबद्ध आहे. विदर्भात महिन्याभरात चार दौरे झाले आहे. वन, जंगल या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत. देशात आतापर्यंत नसेल अशा प्रकारचे सिंगापूरमधील प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय उद्यान येथे तयार होईल. गोंडसमूह संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला या उद्यानात समर्पकपणे मांडण्यात येईल. नागपूरमध्ये लवकरच सिंगापूर सारखी ‘नाईट सफारी ‘सुरू होईल. त्यासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल.

गोसीखुर्द प्रकल्प विदर्भासाठी वरदान आहे. गोसीखुर्दच्या पाण्याने विदर्भाचे मागासलेपण धुऊन काढायचे आहे. त्याआधी एक मे पर्यंत समृद्धी महामार्ग शिर्डी पर्यंत धावायला लागेल. लवकरच सुरजगड प्रकल्प पूर्ण करणार आहे. विदर्भाचा विकास सुरु राहील. एकसंघ विकास काय असतो हे आघाडी सरकार दाखवून देईल.

सफारी दरम्यान त्यांना ‘गोरेवाडाचा राजकुमार’ संबोधल्या गेलेल्या डौलदार वाघाचे दर्शन झाले. त्याचा उल्लेख करून ते म्हणाले, माणसाचा स्वभाव वाघासारखा विशाल असावा. विदर्भाच्या विकासाबाबत असाच विशाल दृष्टिकोन आपला आहे. ते म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या व्यस्ततेत केवळ संजय यांच्या हट्टापायी आज उद्घाटनाला आलो. मात्र हा प्रकल्प सुंदर असून तो निश्चित पूर्णत्वास जाईल. राठोड यांनी या प्रकल्पासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.