मुंबई – बजाज फायनान्स कंपनी भारतातील एनबीएफसी म्हणजे बिगर बॅंकिंग वित्तीय कंपनी म्हणून गेल्या काही वर्षापासून जोरदार घोड-दौड करीत आहे. आता बजाज फायनान्स कंपनीचे बाजार मूल्य हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स काररेशन म्हणजे एचडीएफसीच्या बरोबरीला आले आहे.
किंबहुना 15 फेब्रुवारी रोजी काही काळ बजाज फायनान्स कंपनीचे बाजार मूल्य एचडीएफसी कंपनीच्या बाजार मूल्यापेक्षा जास्त झाले होते. काही काळ बजाज फायनान्स कंपनीचे बाजार मूल्य 4,17,385 कोटी रुपये तर एचडीएफसीचे बाजार मुल्य 4,17,076 कोटी रुपये झाले होते.
गेल्या काही महिन्यांमध्ये एचडीएफसी कंपनीच्या शेअरच्या भावात घट होत आहे. गेल्या वर्षात एचडीएफसीचा शेअर 19 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यानच्या काळामध्ये बजाज फायनान्स कंपनीच्या शेअरच्या भावात मात्र वाढ होत आहे. घर कर्जासाठी एचडीएफसीला इतर बऱ्याच कंपन्यांबरोबर जोरदार टक्कर द्यावी लागत असल्यामुळे एचडीएफसीच्या नफ्यावर परिणाम होऊन त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरच्या भावावर होत असल्याचे दिसून येत आहे.
बजाज फायनान्स कंपनीने वित्तीय तंत्रज्ञानावर भर दिलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कंपनीच्या शेअरच्या भावामध्ये 15 टक्क्यांची घट झाली असली तरी कंपनी नजीकच्या भविष्यामध्ये आगेकूच करेल असे बऱ्याच विश्लेषकांना वाटत आहे.
15 फेब्रुवारी रोजी दीड वाजता बजाज फायनान्स कंपनीच्या शेअरचा भाव 1.9 टक्क्यांनी वाढून 6,920 रुपये झाला होता.
तर एचडीएफसी कंपनीच्या शेअर्सचा भाव 0.9 टक्क्यांनी वाढून 2,318 रुपये प्रति शेअर झाला होता. बजाज फायनान्स कंपनीने तंत्रज्ञानाचा आधार घेतल्यामुळे या कंपनीचे देशभरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. किरकोळ खरेदीसाठी बजाज फायनान्स कंपनीच्या उत्पादनांचा ग्राहकांना फायदा होत आहे. त्यामुळे या कंपनीचा ब्रॅंड आणि बाजार मूल्य वेगाने वाढत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले