लौकी येथील घटना
मंचर-लौकी (ता. आंबेगाव)येथील पाचघर वस्ती नजीक थोरांदळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दगडीखाणी जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अंदाजे एक वर्ष वयाचे बिबट्याचे बछडे मृत्यूमुखी पडले. ही घटना रविवारी (दि.22) रात्री घडली.
सदर घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दूरध्वनीद्वारे वनखात्याला कळवली. पाचघर वस्तीवर बिबट्याचे बछडे मृत्यूमुखी पडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वस्तीवर राणूबाई माता मंदिरापासून ते लौकी गावाच्या हद्दीत बिबट्याची नर-मादी आणि तिची दोन पिल्ले फिरताना ग्रामस्थांनी पाहिली होती. बिबट्याचे बछडे मृत्युमुखी पडल्याने बिबट्या चिडून ग्रामस्थांवर हल्ला करु शकतो. या भीतीने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वनखात्याच्या वतीने एन.एम.आरुडे, कल्पना पांढरे, राजू गाढवे, साईराज दाभाडे, हरिभाऊ डोके यांनी पंचनामा केला. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय कोल्हे यांनी पंचनामा अहवाल वनखात्याकडे पाठविला आहे. भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, सरपंच संदेश थोरात, उपसरपंच गजाबा थोरात, उद्योजक जयवंत थोरात, विनोद थोरात, निलेश थोरात, राजू थोरात, सुदाम काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.