अभिवादन: ज्ञान हाच देव्हारा, पुस्तक हेच ईश्‍वर!

यशेंद्र क्षीरसागर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणविषयक आणि ज्ञानविषयक दृष्टीकोन मूलगामी तसेच सर्वव्यापी होता. स्वतःचे हित त्यांच्या मनाला शिवलेसुद्धा नाही. त्याग, अभ्यास आणि वंचितांच्या उद्धारासाठी सदैव झटण्याची तळमळ हे सर्व गुण शिक्षणामुळे आणि पुस्तकामुळेच त्यांच्या मनात रूजले. बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा संपूर्ण उपयोग समाजासाठी करून ज्ञान आणि शिक्षण यांचे खरे कार्य काय आहे, हे जगासमोर दाखवून दिले. बाबासाहेब यांचा आज दि. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चौफेर व्यक्‍तिमत्त्व अभ्यासले तर लक्षात येते की त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचा गाभा हा शिक्षण हाच आहे. अखंड शिक्षण घेत राहणे आणि त्यासाठी वाटेल तितका अभ्यास आणि वाटेल तो त्याग करण्याची तयारी ठेवणे, हे बाबासाहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होते. प्रचंड विपरीत आणि कठीण परिस्थितीत बाबासाहेब शिक्षण घेत राहिले. पदव्या मिळवत राहिले. इतकेच नव्हे तर, या शिक्षणाचा समाजासाठी काय उपयोग होईल याचे अखंड चिंतन करीत राहिले. समाजाच्या उद्धाराचे चिंतन आणि पुस्तकी शिक्षण हा त्यांचा समांतर प्रवास त्यांना जागतिक स्तरावरील व्यक्‍तिमत्त्व म्हणून ख्याती देऊन गेला. त्यांची अखेरची दौलत शेकडो पुस्तके हीच होती. त्यांचा ज्ञानावर प्रचंड विश्‍वास होता. शिक्षणावर अतूट श्रद्धा होती. पुस्तक हाच त्यांचा ईश्‍वर होता. दलित, पीडित, वंचित, शोषित यांच्या उत्थानासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत लढलेले डॉ. आंबेडकर हे संपूर्ण जगाला मार्गदर्शक, तत्त्वज्ञ आणि सामाजिक शिक्षक आहेत. त्याग, चौफेर अभ्यास, अखंड ज्ञानसाधना ही सर्व वैशिष्ट्य बाबासाहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वात एकवटली होती. म्हणूनच 7 नोव्हेंबर हा दिवस “शाळा प्रवेश दिन’ म्हणून साजरा केला जातो. तर, त्यांची जयंती “ज्ञान दिन’ म्हणून साजरी केली जाते.

मध्यप्रदेशात महू येथे 14 एप्रिल 1891 मध्ये जन्मलेल्या बाबासाहेबांनी अखेरपर्यंत म्हणजेच 6 डिसेंबर 1956 पर्यंत आयुष्यभर प्रचंड अपमान हालअपेष्टा सहन करत शिक्षण घेतले. हे शिक्षण कधीही भौतिक सुखासाठी नव्हते. चांगले कार्य करूनसुद्धा प्रचंड सामाजिक अवहेलना सहन करण्याची शक्‍ती बाबासाहेबांना शिक्षणानेच दिली. समाजातील वंचितांना, शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण घेणे आवश्‍यक आहे, हा त्यांचा शुद्ध हेतू होता. जीवनात कितीही संघर्ष असू दे, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व पातळ्यांवरील संघर्ष शिक्षणामुळे आपण पचवू शकतो. सामना करू शकतो, ही ताकद शिक्षणात आणि ज्ञानात आहे. पुस्तकात आहे. आपल्या मनाची ताकद शिक्षणामुळेच वाढते. विचारांची बैठक शिक्षणामुळे पक्‍की होते. या सर्व तत्त्वांवर बाबासाहेबांचा प्रगाढ विश्‍वास होता. विपरीत परिस्थितीचा सामना करत बाबासाहेबांनी एम. ए., अर्थशास्त्रातील डी. लीट., पीएच.डी., बॅरिस्टर अशा अनेक पदव्या मिळवल्या. या पदव्या घेत असताना ज्ञानाची लालसा आणि चौफेर व्यक्‍तिमत्त्व घडवणे या दोन्ही हेतूंनी बाबासाहेब भारावले होते.

“द प्रॉब्लेम ऑफ रुपी’, “कास्ट इन इंडिया’, “द अनटचेबल्स’, “थॉट्‌स ऑन पाकिस्तान’, “बुद्ध ऍन्ड हिज धम्म’ अशी अनेक आशयघन आणि ज्ञानप्रचुर पुस्तके, ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. त्यांचे संस्थात्मक योगदानही मोठे होते. त्यांनी मूकनायक साप्ताहिक 1920 मध्ये सुरू केले. राजर्षी शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा विश्‍वास संपादन केला. छत्रपती शाहू महाराजांच्या मदतीने इंग्लंडला आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने अमेरिकेला उच्च शिक्षण घेतले. आपण आपल्या व्यक्‍तिमत्त्वामध्ये पात्रता निर्माण करून आपल्या ज्ञानलालसेने मदत खेचून आणली पाहिजे. आपल्या चांगुलपणाने, आपल्या नम्र वागण्याने आणि आपल्या मधुर वाणीने खूप मोठ्या व्यक्‍तीसुद्धा आपल्या जवळ येऊन आपल्याला मदत करू शकतात. हेच बाबासाहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वातून आणि जीवनपटातून दिसून येते. 1930 मध्ये त्यांनी जनता वृत्तपत्र सुरू केले. 1956 मध्ये त्याचे नामांतर प्रबुद्ध भारत असे झाले. बाबासाहेब लेखक, निष्णात वकील, उत्कृष्ट वक्‍ते तसेच पत्रकारसुद्धा होते.

2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतका काळ रात्रंदिवस राबून त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली. हे प्रचंड आणि महान कार्य होते. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये ही घटना स्वीकारली तर 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना अमलात आली. त्याअगोदर मजूर पक्षाची स्थापना, मूकनायक वृत्तपत्र सुरू करणे असो की जनता वृत्तपत्र सुरू करणे असो; अशा सर्व टप्प्यांवर बाबासाहेबांनी अखंड संघर्ष केला. कौटुंबिक पातळीवर असो की सामाजिक पातळीवर अथवा राजकीय पातळीवर असो, सर्व बाजूंनी त्यांचा संघर्ष टोकदार होत गेला. या वाटचालीतील संघर्ष मोठ्या धैर्याने करण्याची प्रेरणा शिक्षणामुळे आणि ज्ञानामुळेच मिळाली. बाबासाहेबांना हे चांगलेच ठाऊक होते की; शिक्षणात ही शक्‍ती आहे. शिक्षण घेऊन मला काय मिळेल, असा संकुचित दृष्टिकोन ठेवणारे बाबासाहेब नव्हते.

संत गाडगेबाबा अशा महान व्यक्‍तींशी बाबासाहेबांचा संपर्क होता. त्यांच्यावर बाबासाहेबांचे आणि बाबासाहेबांवर अशा महान व्यक्‍तींचे प्रचंड प्रेम होते. एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा महान संतांच्या प्रेमाला पात्र होतो; याचा अर्थ हा शिक्षणाचा खूप मोठा विजय आहे. बाबासाहेबांनी भरपूर पुस्तके लिहिली. खूप संस्था काढल्या. खूप पदव्या मिळवल्या. हा भाग तर महत्त्वाचा आहेच. परंतु; हे सर्व करण्यामागील त्यांची तत्त्वे आणि प्रेरणा काय होती, हे मात्र खास करून लक्षात घेतले पाहिजे. महात्मा गांधी यांच्याबरोबरचा पुणे करार असो की; हिंदू कोड बिल असो अशा खूप मोठ्या प्रसंगातून बाबासाहेब घडत गेले. त्यांनी संघर्ष केला. मनुस्मृतीचे दहन असो की महाडचे चवदार तळ्याचे आंदोलन असो अशा ठिकाणी बाबासाहेबांच्या व्यक्‍तिमत्त्वाचा, बुद्धीचा, ज्ञानाचा कस लागला. तिथे त्यांचे ज्ञान आणि शिक्षण उजळून निघाले. व्यक्‍तिमत्त्व जागतिक झाले. त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाला वैश्‍विक परिमाण लाभले. प्रचंड अभ्यास, ध्येयाची आसक्‍ती, सहनशीलता, समर्पणशीलता, पराकोटीची नम्रता या गुणांबरोबरच समाजाविषयी प्रेम आणि वंचित, पीडित आणि शोषित बांधवांच्या उद्धाराची प्रचंड तळमळ हे गुण आपण सर्वांनीच आत्मसात केले पाहिजेत.

शिक्षण आणि ज्ञान मिळवण्यासाठी वयाची अट नाही. सदैव शिकत राहिले पाहिजे. ज्ञान मिळवले पाहिजे. पुस्तकांच्या प्रेमात रमले पाहिजे. पुस्तक हीच खरी संपत्ती आहे. हे बाबासाहेबांचे विचार होते. त्यांच्या ज्ञानप्राप्तीचा आवाका आणि वाटचाल पाहिली तर त्यांच्या वयानुसार कधीही शिक्षणप्रेमात घट झाली नाही. खंड पडला नाही. शिक्षण आणि ज्ञानाची व्याप्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्‍वव्यापी केली, हेच खरे.

Leave A Reply

Your email address will not be published.