Baba Maharaj Satarkar – ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचे ८९ व्या वर्षी निधन झालं आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भागवत धर्माची महान परंपरा बाबा महाराज सातारकर यांनी मोठ्या आस्थेने जपली.
खुमासदार शैलीने आणि सोप्या शब्दात त्यांनी अनेकांचे अध्यात्मिक आयुष्य समृद्ध केले त्यांचे अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात त्यांचा जन्म झाला होता.
वास्तविक ‘निळकंठ ज्ञानेश्वर गोरे’ हे त्यांचं मूळ नाव होतं. मात्र, पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना “बाबा महाराज सातारकर’ हे नाव मिळालं ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिलं.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad paawar) यांनी देखील बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘ज्येष्ठ निरुपणकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत मालवली ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुःखदायक आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती होती. बाबा महाराज सातारकर यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाचा वाटा मोलाचा होता. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केले.
रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं वैशिष्ट्य. ज्यांच्या कीर्तनाची ख्याती राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात होती अशा थोर बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!!’ असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.
दरम्यान, बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येईल. उद्या म्हणजेच शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.