नगर -केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष कार्यक्रमांतर्गत नगर जिल्ह्यासाठी आयुष रुग्णालय मंजूर झाले असून सध्या या दवाखान्याचे काम वेगात सुरू आहे. मागील दोन वर्षात करोनाच्या संकटामुळे कामकाज थंड होते. आता मात्र काम वेगात सुरू असून नव्या वर्षात रुग्णालय नगरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
ऍलोपॅथी उपचारांना पर्याय तसेच रुग्णांना आयुर्वेदापासून होमिओपॅथीपर्यंतचे उपचार मिळण्यासाठी आयुष हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, युनानी, सिद्ध यांसारख्या उपचार पद्धतींचा प्रचार व प्रसारास सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत नगरमध्ये रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर साधारण डिसेंबर 2018 मध्ये निधी मंजूर करण्यात आला होता.
त्यानंतर कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र, पुढे कामकाज रखडले. प्रशासकीय पातळीवर संथ कारभाराचाही फटका बसला. त्यानंतर तर करोनाचे संकट आले. जवळपास दोन वर्षे हे संकट होते. त्यामुळे कामकाजाचा वेग मंदावला होता. त्यामुळे 2022 वर्ष संपत आले तरीही कामकाज पूर्ण झालेले नाही. दवाखान्याचे बरेच काम अद्याप बाकी राहिले आहे. त्यामुळे आता कामे वेगात केली जात असून नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योगा, सिद्ध उपचार पद्धती मिळणार आहेत. या प्रत्येक उपचारांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ऍलोपॅथीप्रमाणेच या पद्धतीचेही उपचार जिल्ह्यातील रुग्णांना मिळणार आहेत.
अन्य शहरांत जाण्याची गरज नाही
<सिव्हिलमध्ये या अगोदरच स्वतंत्र आयुष विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात रुग्णांची तपासणी करून आयुर्वेद व होमिओपॅथी पद्धतीने उपचार केले जात आहेत. यानंतर पुढील टप्प्यात शंभर खाटांचे आयुष रुग्णालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. या रुग्णालयाचे काम आता सुरू असून लवकरच हे हॉस्पिटल नगरमध्ये सुरू होईल. त्यानंतर जिल्ह्यातील रुग्णांना अन्य शहरांत जाण्याची गरज राहणार नाही.