एडस दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय व राजवाडा परिसरात फ्लॅश मॉब
सातारा – जागतिक एड्स दिनानिमित्त उद्या दि. 1 डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय व राजवाडा परिसरात महाविद्यालयीन युवक फ्लॅश मॉबचे (पथ नाट्य) सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात उद्या दि. १ रोजी सकाळी साडेआठ वाजता जनजागृती रॅलीचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत रॅलीला झेंडा दाखवण्यात येणार आहे. उपस्थितांना एचआयव्हीविरोधी शपथ देण्यात येणार आहे. रॅलीदरम्यान जिल्हा रुग्णालय व राजवाडा परिसरात गांधी मैदानावर महाविद्यालयीन विद्यार्थी फ्लॅश मॉबचे सादरीकरण करणार आहेत . १ ते ३ डिसेंबर यादरम्यान जिल्ह्यामधील सर्व महाविद्यालये, अकॅडमीमधील युवक युवतींसाठी जनजागृतीपर व्याख्याने व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एचआयव्हीसह संसर्गित वय 11 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. विज्ञान- काळजी व आधार प्रकल्प यांच्या समन्वयाने एचआयव्ही संसर्गित युवक युवतींसाठी १२ डिसेंबर रोजी वधू वर मेळावा होणार आहे. या जनजागृती उपक्रमामध्ये सर्व महाविद्यालयातील, अकॅडमीमधील युवा मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.