कारण सांगण्यास विमानतळ प्रशासनाचा नकार
पुणे – विमानसेवा असूनही ती उशिराने उड्डाण घेत असल्याने प्रवाशांना ताटकळत रहावे लागत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारांना प्रवासी वैतागले आहेत. विमानतळ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे संतप्त प्रवाशांकडून सांगण्यात आले.
पुणे ते दिल्ली दरम्यान स्पाइस जेटच्या विमानांना सोमवारपासून उशीर होत आहे. सोमवारी तीन विमानांना उशीर झाल्यानंतर मंगळवारी देखील एका विमानाला साडेतीन तास उशीर झाला. तर, एअर एशियाच्या इंडियाच्या दिल्ली पुणे विमानाला चार तास उशीर झाला. त्यामुळे पुणे-दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वेळोवेळी हाल होत आहे.
पुण्यातून सर्वाधिक विमाने दिल्लीसाठी उड्डाण करतात. असे असताना, विमानांना उशीर होणार नाही, याबाबतची खबरदारी संबधीत विमान कंपनीसह विमानतळ प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. तसेच, दिल्लीहून पुण्याला लखनौमार्गे येणाऱ्या विमानाला चार तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे ते दिल्ली विमान सेवेच्या वेळेत गडबड का झाली, हे विमानतळ प्रशासनाने सांगण्यास नकार दिला.
दुबईहून येणाऱ्या विमानाला उशीर
पुणे-दुबई दरम्यान विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमानाला उशीर होण्याचा सतत फटका बसत आहे. सोमवारी मध्यरात्री बारा वाजता पुण्यासाठी उड्डाण करणाऱ्या विमानाला सात तास उशीर झाला. त्या विमानाने सकाळी सात वाजता पुण्यासाठी उड्डाण केले. तसेच, मंगळवारी रात्रीच्या दुबईच्या विमानाला उशीर असल्याचे विमान कंपनीकडून सांगितले आहे.