- आयुक्त हर्डीकर ः पुणे-मुंबईसारखी अवस्था होऊ नये, यासाठी काळजी घ्या
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात आटोक्यात येत असलेला “करोना’चा प्रादुर्भाव अचानकच वाढला आहे. करोना बाधित रुग्ण आढळल्याने आणि संसर्ग वाढण्याची शक्यता पाहता पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग “मायक्रो सील’ करण्यात आले आहेत. दरम्यान दिलासादायक बातमी अशी की मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार गेल्या दोन दिवसांपासून शहरात एकही नवा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान आपल्या शहराची अवस्था पुण्यासारखी होऊ नये, असे वाटत असेल तर काळजी घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील खराळवाडी, चिखली परिसरातील घरकुल वसाहतीमधील पाच इमारती, पडवळनगर थेरगाव, हे काही भाग “मायक्रो सील’ करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत 561 संशयित रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 509 रुग्णांना करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 32 रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. शहरात सध्या आठ करोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाची लागण झालेले सुरुवातीचे बारा रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधित आणि संशयित असे एकूण 42 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. या सर्वांची तब्येत स्थिर आहे.
शनिवारी (दि.4) एकाच दिवशी सहा जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामध्ये दिल्लीतून आलेल्यांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील चार, अमेरिकेतून आलेला एक आणि पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा समावेश होता. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. परंतु सुदैवाने गेल्या दोन दिवसांपासून (मंगळवारी सायंकाळपर्यंत) शहरात एकाही रुग्णाना करोनाची लागण झाली नसल्याचे सायंकाळच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या हद्दीत 1846 नागरिक प्रवास करुन आले आहेत. त्यापैकी 1231 नागरिकांनी 14 दिवसांचा निरीक्षणाचा काळ पूर्ण केला आहे. तर 615 नागरिक अद्यापही निरीक्षणाखाली आहेत.
मंगळवारी 32 संशयित दाखल
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये 32 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्राव राष्ट्रीय विषाणूविज्ञान (एनआयव्ही) संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
त्या खासगी रुग्णालयातील 42 डॉक्टर निगेटिव्ह
एका खासगी रुग्णालयातील करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या 42 डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. रिक्षा चालकावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर तो चालक करोना बाधित असल्याचे समोर आले होते. त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे