थकबाकीपोटी मनपाने गाळ्याला ठोकले टाळे

नगर – मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीपोटी महापालिकेने सक्तीची कारवाई सुरू केली आहे. माळीवाडा प्रभाग कार्यालयाने नगर शहरातील बाजारपेठेत धडक कारवाई करुन मालमत्तेला टाळे ठोकले आहे. जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार मनपाने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी वसुलीचा आढावा घेतला. गुरुवारी (दि.5) माळीवाडा प्रभाग कार्यालयाने जुना कापड बाजार परिसरात रुख्मिणीबाई मोहनलाल खंडेलवाल यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्याकडे 1 लाख 92 हजार रुपयांची थकबाकी आहे. कारवाईदरम्यान आणखी दोन थकबाकीदारांनी 4 लाख 55 हजारांची संपूर्ण थकबाकी जमा केल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे.

वसुली विभाग प्रमुख जी. एच. झिने, प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरीक्षक शाम गोडळकर, अंशराम आढाव, प्रकाश गांगुल, अजिम शेख, विजय बोधे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. मालमत्ताधारकांनी थकबाकी जमा करुन कारवाई टाळावी, असे आवाहन उपायुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.