अखेर केडगाव ते निर्मलनगर बससेवा सुरू

दैनिक प्रभातच्या पाठपुराव्याला आले यश; लवकरच भिंगारलाही धावणार बस

नगर – महानगरपालिकेकडून नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी शहरात दीपाली ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून बससेवा सुरु करण्यात आली आहे. सुरुवातील 15 ते 30 बसेसे दीपाली ट्रान्सपोर्ट कडून, सुरु करण्यात येणार असल्याचे करारात म्हटले होते. मात्र, शहरात फक्त 11 बसेस सुरु होत्या. त्यामुळे अनेक भागात नागरिकांना बससेवा मिळत नसल्याचे दैनिक प्रभातने वृत्त प्रकाशीत केले होते. त्याची दखल घेत दीपाली ट्रान्सपोर्ट कडून आणखी बस खरेदी करण्यात आल्या असून त्याचा प्रारंभा आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. त्यामुळे केडगाव ते निर्मलनगर परिसरातील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लता शेळके, नगरसेविका गौरी नन्नवरे, उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, अभियंता परिमल निकम, नगरसेवक मनोज कोतकर, राहूल कांबळे, मनोज दुलम, विलास ताठे, सतिश शिंदे, गणेश नन्नवरे, बच्चन कोतकर, सुनील कोतकर, दीपाली ट्रान्सपोर्टचे संचालक महेश गाडे, आशिष शिंदे आदी उपस्थित होते.

शहरात दिपाली ट्रान्सपोर्टच्या वतीने गेल्या सात-आठ महिन्यांपासून शहर बस सेवा चालविली जात आहे. प्रारंभी आठ बस गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यात तीन गाड्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे सध्या निंबळक 2, विळदघाट इंजिनिअरींग कॉलेज 5 व निर्मलनगर 4 या मार्गावर बसेस चालविल्या जात होत्या. त्यात आणखी तीन गाड्यांची भर पडली असून आता एकूण 14 गाड्या झाल्या आहेत. यात तीन वाढीव गाड्यांमुळे केडगावची बससेवा सुरू करण्यात आली आहे.

केडगावला बस सेवा शुक्रवारी (दि.6) सकाळी 6 वाजेपासून सुरु होणार आहे. ही बस केडगावच्या शाहूनगर येथून निघून नगर शहरातील बसस्थानक ते निर्मलनगर पर्यंत धावणार आहे. तसेच निर्मलनगरहून पुन्हा बसस्थानक ते शाहूनगर अशी सेवा राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर एकूण सात बसगाड्या सेवा देणार असून दर 15 मिनिटाला शाहूनगर तसेच निर्मलनगर येथून या गाड्या सुटणार आहेत. त्यामुळे केडगावहून सावेडी उपनगरात तसेच सावेडी उपनगरातून थेट केडगावला जाणाऱ्या नागरिकांची सोय होणार असल्याचे प्रा. गाडे यांनी सांगितले. बस गाड्यांच्या ताफ्यात आणखी तीन नव्या गाड्या लवकरच दाखल होणार असून, त्या दाखल होताच भिंगार मार्गावरील बस सेवाही सुरू केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)