मेलबर्न – सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धांतील मोसमातील पहिल्याच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेला येथे प्रारंभ झाला. या स्पर्धेत पहिल्याच फेरीच्या लढतीत जोकोवीचचा कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनचा राफेल नदालने अफलातून पुनरागमन करताना विजय मिळवला व थाटात दुसरी फेरी गाठली.
नदालने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या मार्कोस गिरॉन याचा 6-1, 6-4 व 6-2 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली. त्याने हा सामना केवळ 49 मिनिटात जिंकला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या इतिहासात नदालचा हा 70वा विजय ठरला. या स्पर्धेत नदालची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. स्पर्धेच्या इतिहासात त्याला केवळ एकदाच 2009 साली ही स्पर्धा जिंकता आलेली आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेवर आतापर्यंतच्या इतिहासात सर्बियाच्या नोवाक जोकोवीचचेच वर्चस्व राहिलेले आहे. त्याने तब्बल 9 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्याच्यानंतर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडररने ही स्पर्धा 6 वेळा जिंकली आहे.
स्पर्धेच्या मुख्य फेरीत झालेल्या पुरुष एकेरीच्या अन्य लढतीत अमेरिकेच्या टॉमी पॉलने मिखाइल कुखुश्कीनचा 6-3, 6-4, 6-2 असा पराभव केला. ऑस्कर ओटेने चेंग सुआन सीनवर 6-4, 6-3, 6-2 अशी मात केली. महिलांच्या एकेरीच्या सलामीच्या सामन्यात मानांकित अश्ले बार्टीने लिसा सुरेंकोवर 6-0, 6-1 असा विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. अन्य लढतीत मानांकित बार्बरा क्रेझीकोव्हाने आंद्रेया पेट्रोव्हीकचा 6-2, 6-0 असा पराभव केला.