नवी दिल्ली -देशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि सहव्याधी असणाऱ्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना करोनालसींचा बूस्टर (प्रीकॉशन) डोस देण्याची प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरू झाली. तेव्हापासून 8 दिवसांत देण्यात आलेल्या बूस्टर डोस संख्येने सोमवारी 50 लाखांचा टप्पा ओलांडला.
करोना संकट दाखल झाल्यानंतर देशात मागील वर्षीच्या 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत देशात देण्यात आलेल्या डोसची एकूण संख्या 158 कोटींच्या घरात पोहचली आहे.
देशातील लसीकरण मोहिमेची व्याप्ती टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली. चालू वर्षापासून (3 जानेवारी) 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीनांचे लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर आठवडाभराने बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.