एकदिवसीय मालिकेचा अंतिम सामना आणि शेवटच्या चेंडूवर विरोधी संघाला सामना अनिर्णित राखण्यासाठी सहा धावांची गरज असते… आणि त्या निर्णायक क्षणी विरोधी संघाचा कर्णधार घाबरून जातो. अशा परिस्थितील क्षेत्ररक्षण करणार्या संघाचा कर्णधार असे काही कृत्य करतो की ज्यामुळे त्याच्यासह संघाचीही क्रिकेट जगतात नाचक्की होती.
होय! आपण ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार ग्रेग चॅपल आणि त्याचा भाऊ ट्रेव्हर बद्दल बोलत आहोत. आजच्याच दिवशी 41 वर्षांपूर्वी क्रिकेटच्या इतिहासातील क्रिकेटमधील सर्वात मोठी घृणास्पद घटना घडली होती.
न्यूझीलंड विरुद्ध मेलबर्न मैदानावरील घटना
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील बेन्सन आणि हेजेस वर्ल्ड सीरिजच्या अंतिम फेरीतील पाच अंतिम सामन्यांपैकी पहिल्या दोन सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी एक विजयासह बरोबरीत होते. स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते.
शेवटच्या चेंडूवर ग्रेग चॅपलची कृप्ती
त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 235 धावा केल्या होत्या. कर्णधार ग्रेग चॅपलने 95 धावांची खेळी खेळली. धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या न्यूझीलंडचा सलामीवीर ब्रूस एडगरने शतक झळकावले आणि संघाला एकहाती विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 15 धावांची गरज होती. कर्णधार ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हरकडे चेंडू दिला. ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना गमवायचा नव्हता.
… खेळ भावनेविरुद्ध कृत्य
सामना बरोबरीत सोडवण्यासाठी न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित होता, तरीही ग्रेग चॅपलला भीती वाटत होती. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याच्या दृष्टीने ग्रेग चॅपलने, ट्रेव्हरला शेवटचा चेंडू अंडरआर्म टाकायला सांगितले. शेवटचा चेंडू अंडरआर्मचा असेल असे दोन्ही पंचांना सांगण्यात आले. मोठ्या भावाचे ऐकूण ट्रेव्हरनेही तेच केले. आणि ट्रेव्हरने फलंदाज ब्रायन मॅकेनीच्या दिशेने अंडर आर्म चेंडू फेकला. अशी गोलंदाजी क्रिकेटच्या नियमानुसार चुकीची नव्हती, पण ही कृती खेळाच्या भावनेविरुद्ध होती.
ब्रायन मॅकेनी थक्क झाला
ट्रेव्हिसने अंडरआर्म चेंडू फेकल्यानंतर न्यूझीलंडचा फलंदाज ब्रायन मॅकेनी थक्क झाला आणि रागाच्या भरात बॅट जमिनीवर फेकली. मॅकेनीला षटकार मारून सामना बरोबरीत आणण्याची संधी होती, परंतु वादग्रस्त अंडरआर्म गोलंदाजीमुळे तो तसे करु शकला नाही. अखेर ऑस्ट्रेलियाने हा सामना 6 धावांनी जिंकला. दोन दिवसांनंतर चौथा अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका 3-1 अशी जिंकली.
’नाही ग्रेग, तू हे करू शकत नाहीस..’
ही घटना 1 फेब्रुवारी 1981 ची आहे. या दिवशी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात ’वाईट’ चेंडू टाकण्यात आला होता. खरे तर तो ’अंडरआर्म’ चेंडू होता. सामन्याच्या निर्णायक क्षणी ग्रेग आणि ट्रेव्हर चॅपल या बंधूंनी मैदानावर अशा चाली खेळल्या की संपूर्ण क्रिकेट जगताची मान खाली गेली. गमतीची गोष्ट म्हणजे ग्रेग आणि ट्रेव्हर यांचा दोघांचा मोठा भाऊ जो त्या सामन्यावर कॉमेंट्री करत होता, इयान चॅपेल ही कृती पाहून रडत-रडत म्हणाला ’नो ग्रेग, तू हे करू शकत नाहीस..’
…. क्रिकेट विश्वात ’भूकंप’
या घटनेने क्रिकेट विश्वात भूकंप झाला. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना निवेदने द्यावी लागली. न्यूझीलंडचे पंतप्रधान रॉबर्ट मुल्डून यांनी याला भ्याड कृत्य म्हटले. ते म्हणाले, माझ्या आठवणीत ही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात घृणास्पद घटना आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम फ्रेझर म्हणाले, ’हे खेळाच्या परंपरेच्या विरोधात होते.’
अखेर अंडरआर्म गोलंदाजीवर बंदी
या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला क्रिकेटच्या नियमांमध्ये सुधारणा करावी लागली. या घटनेनंतरच क्रिकेटमध्ये अंडरआर्म गोलंदाजीवर तात्काळ बंदी घातली होती. पुढे ग्रेग चॅपलनेही आपली चूक मान्य केली. ट्रेव्हर चॅपलला नेहमी खेद वाटत होता की त्याने आपल्या भावाचा सल्ला स्वीकारला आणि त्याचे नाव क्रिकेटच्या गडद अध्यायाशी कायमचे जोडले.