मुंबई – क्रिकेटचा ‘देव’ म्हणून ओळख असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 50वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असतात. दरम्यान, सचिनच्या वाढदिवसानिमित्त ऑस्ट्रेलियाकडून त्याला एक खास गिफ्ट मिळाले आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे त्याच्या नावाच्या गेटचे अनावरण करण्यात आले आहे.
सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि सचिनचं नातं…
सिडनी क्रिकेट ग्राउंड आणि सचिनचे पूर्वीपासून अतिशय दृढ नाते मानले जाते. सिडनी क्रिकेट ग्राउंड हे भारताबाहेरचे माझे आवडते मैदान आहे असे सचिन नेहमी म्हणत असतो. 1991-92 च्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून त्याच्या काही खास आठवणी SCG शी जोडलेल्या आहेत. त्याने SCG वर पाच कसोटी सामन्यांमध्ये 157 च्या सरासरीने 785 धावा केल्या आहेत.
त्यात नाबाद 241 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या देखील ह्याच मैदानावर नोंदवली आहे. तसेच ब्रायन लाराच्या 277 धावांच्या खेळीला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ब्रायन लाराच्या नावाच्या गेटचे अनावरणही SCG येथे करण्यात आले. या दोन्ही गेट्सचे अनावरण एससीजीचे अध्यक्ष रॉड मॅकगिओच आणि सीईओ केरी माथेर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांच्या हस्ते करण्यात आले.
सचिन आणि लारा ने व्यक्त केल्या भावना…
सचिन म्हणाला कि, ‘माझ्या आणि माझा चांगला मित्र ब्रायन लारा यांच्या नावावर असलेल्या एससीजीमध्ये प्रवेश करण्यासाठी खेळाडू गेटचा वापर करतील हा मोठा सन्मान आहे. याबद्दल मी सिडनी क्रिकेट ग्राऊंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे आभार मानतो. मी लवकरच एससीजीला भेट देईन.
तर लारा म्हणाला, ‘सिडनी क्रिकेट ग्राऊंडकडून मिळालेल्या या ओळखीमुळे मी खूप सन्मानित आहे आणि मला खात्री आहे की सचिनलाही असेच वाटत असेल. माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या या मैदानाच्या खास आठवणी आहेत आणि जेव्हाही मी ऑस्ट्रेलियात असतो तेव्हा मला या मैदानाला भेट दिल्यावर आनंद होतो.’ असं लारा म्हणाला आहे.