आज तीन सत्रांमध्ये होणार मैफिली; नि:शुल्क प्रवेश असलेला एकमेव संगीत महोत्सव
औंध – शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा औंध संगीत महोत्सव यंदा उद्या, दि. 19 रोजी होणार आहे. या महोत्सवात दिग्गज कलाकारांच्या मैफिलींचा आस्वाद श्रोत्यांना घेता येणार आहे.
ग्वाल्हेर घराण्याचे बुजुर्ग गायक व गुरू पं. अनंत मनोहर जोशी आणि त्यांचे सुपुत्र व व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी या पिता-पुत्रांनी त्यांचे अध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1940 पासून औंध येथील स्वामींच्या समाधीस्थानी संगीत महोत्सव सुरू केला. या महोत्सवात आतापर्यंत असंख्य ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांनी हजेरी लावली आहे.
त्यामध्ये माणिक वर्मा, गानहिरा हिराबाई बडोदेकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, शिवरामबुवा वझे आदी दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. शास्त्रीय संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने पं. गजाननबुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 1980 मध्ये शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हा महोत्सव सलग 24 तास आयोजित केला जातो. ग्रामीण भागात नि:शुल्क प्रवेश असलेला हा एकमेव शास्त्रीय संगीत महोत्सव असून. यंदा महोत्सवाचे 79 वे वर्ष आहे.
तीन सत्रांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या महोत्सवात अनेक नामवंत कलाकारांच्या मैफिलींचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. माजी आमदार प्रभाकर घागे यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या सत्राची सुरुवात पं. गजाननबुवा जोशी यांच्या नाती अपूर्वा गोखले व श्रीमती पल्लवी जोशी यांच्या सहगायनाने होईल. त्यानंतर फारुख लतीफ यांचे सारंगीवादन होईल. ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या गायनाने प्रथम सत्राची सांगता होईल. दुपारी 4 वाजता द्वितीय सत्राची सुरुवात विदुषी शुभदा पराडकर यांच्या मैफिलीने होईल. त्यानंतर आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अरुणा शिकाळकर यांची मैफिल होणार असून शिवानंद प्रतिष्ठानतर्फे “रियाझ’ या स्मरणिकेचे प्रकाशन होईल.
याप्रसंगी पिपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण भोळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी साताऱ्यातील ज्येष्ठ कलाकार रामभाऊ पवार यांचा सत्कार करण्यात येणार आहेल. शमा भाटे यांच्या शिष्या अमिरा पाटणकर यांच्या कथक नृत्याने या सत्राची सांगता होईल. अखेरचे सत्र रात्रौ 10 वाजता सुरू होईल. प्रारंभी पं. व्यंकटेश कुमार यांचे गायन तर पांडुरंग पवार यांचे एकल तबला वादन होईल.
त्यानंतर गायिका श्रीमती अनुराधा कुबेर यांची मैफिल आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य पं. रूपक कुलकर्णी यांचे बासरीवादन होईल. त्यांना पं. अरविंदकुमार आझाद हे तबला साथ करणार आहेत. ज्येष्ठ गायक पं. दिनकरबुवा पणशीकर यांच्या मैफिलीने महोत्सवाची सांगता होईल. त्यांना स्वप्निल भाटे तबला साथ करणार आहेत. संपूर्ण महोत्सवात सिद्धेश बिचोलकर व प्रवीण कासलीकर हे संवादिनीवर स्वरसाथ तर स्वप्नि भिसे आणि प्रवीण करकरे हे तबला साथ करणार आहेत. या महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आव्हान अपूर्वा गोखले यांनी केले आहे.